चाकूरच्या १६० ग्राहकांनी स्मार्ट मीटर घेतले बसवून

चाकूर (प्रतिनिधी): दि. २० जुलै : स्मार्ट मीटर बसवण्यबाबत वीजग्राहकांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरण अनेक उपाययोजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणनच्या चाकूर उपविभागाने तातडीने सुसंवादाची भूमिका घेत रिडींग जास्त येत आहे या ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जून्या मीटर सोबतच सिरीज मध्ये स्मार्ट मीटर लावत दोन्ही मीटरचे रिडींग सारखेच येते हे सिध्द करून दाखविल्यामुळे आठवडयाभरात १६० वीजग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेत महावितरणला सहकार्य केले.
मुख्य अभियंता अरविंद बुलबुले व अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी यांच्या सुचनेनुसार चाकूर उपविभागामध्ये स्मार्ट मीटर बाबत शंकांचे निरसन करण्याच्या उपाय योजना करण्यात आल्या. तक्रार निवारण मेळाव्यासोबतच जूने मीटर व स्मार्ट मीटर मधील रिडींग मध्ये ग्राहकांव्या वापरानुसारच अचूक रिडींग येत असल्याचे सिरिज मीटर लावून सिध्द करून दाखविण्यात आले. ग्राहकांच्या शंकांचे निरसन होत असल्याने वीजग्राहक स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करत आहेत. सहाय्यक अभियंता अमोल मुखेडकर, कनिष्ठ अभियंता सुप्रिया पांडे, वडवळ शाखा अभियंता गोपाळ जोशी, सहाय्यक लेखापाल आनंद आचार्य, रवी गायकवाड, संदीप तिकटे, प्रतिक्षा चामवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार चाकूर उपविभाग कार्यालया अंतर्गत ग्राहकांच्या भेटी, बैठका आयोजित करत बैठकीत स्मार्ट मीटरचे कार्य, त्याचे फायदे, पारदर्शक वीज वापर नोंद, अचूक बिलिंग आणि ग्राहकांसह महावितरणच्या हिताच्या दृष्टीने स्मार्ट मीटरचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. शंकांचे समाधान झाल्याने चाकूर शहरातील सत्यसाईबाबा रोड, परिसरातील १६० वीजग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतले आहेत. ग्राहकांच्या वीज बिलासंदर्भातील शंका व तक्रारी ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात येत असल्याने व भविष्यात कोणत्याही ग्राहकाला चुकीचे किंवा अवास्तव वीज बिल आल्यास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तत्परतेने मदत करतील, अशी हमी देण्यात आल्याने महावितरणच्या या संवादात्मक व सकारात्मक भूमिकेमुळे चाकूर उपविभाग परिसरातील वीजग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
