
२४७ ग्रीन बेल्टपैकी ८० वर अतिक्रमण; १०० हून अधिक ग्रीन बेल्टचा मूळ उद्देश हरवला
लातूर : पर्यावरण दिनानिमित्त शहरभर दिंड्या, वृक्षारोपणाचे कार्यक्रम, सोशल मीडियावरील हिरव्यागार पोस्ट आणि पर्यावरण रक्षणाच्या घोषणा सुरू आहेत. मात्र लातूर शहरातील ग्रीन बेल्टचे वास्तव याच्या नेमके उलट चित्र दाखवत आहे. शहरातील एकूण २४७ ग्रीन बेल्टपैकी तब्बल ८० ग्रीन बेल्टवर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे, तर १०० हून अधिक ग्रीन बेल्टचा मूळ उद्देशच हरवून बसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी राखीव ठेवलेल्या जागांवर आज विविध बांधकामे उभी राहिली आहेत. अनेक ठिकाणी ग्रीन बेल्टचा वापर हरित पट्टा म्हणून नव्हे तर इतर कारणांसाठी होत आहे. परिणामी शहराची फुफ्फुसे समजल्या जाणाऱ्या जागांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
३० उद्यानांमध्ये झाडेच शिल्लक राहिलेली नाहीत. वॉकिंग ट्रॅक उद्ध्वस्त झाले आहेत. संरक्षण भिंती कोसळल्या आहेत. नागरिकांसाठी विकसित केलेल्या उद्यानांमध्ये आज मोकाट जनावरांचा वावर दिसून येतो. ही परिस्थिती केवळ दुर्लक्षाची नसून पर्यावरणीय नियोजनाच्या अपयशाची साक्ष देणारी आहे.

आयुक्त महोदय, नवीन झाडे लावण्यापेक्षा गायब हिरवाईचा हिशेब द्या!
पर्यावरण दिनी हजारो रोपे लावल्याच्या घोषणा होतात. फोटो काढले जातात. सोशल मीडियावर पर्यावरणप्रेमाचे संदेश झळकतात. मात्र शहरातील ग्रीन बेल्टची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना या औपचारिक उपक्रमांचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
लातूरकरांना आता वृक्षारोपणाच्या नव्या घोषणा नकोत, तर शहरातील प्रत्येक ग्रीन बेल्टची वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे. २४७ पैकी किती ग्रीन बेल्ट प्रत्यक्षात हरित पट्टा म्हणून अस्तित्वात आहेत? ८० ग्रीन बेल्टवरील अतिक्रमण हटविण्यासाठी काय कारवाई झाली? आणि १०० हून अधिक ग्रीन बेल्टचा मूळ उद्देश का आणि कसा हरवला?
‘गायब ग्रीन बेल्ट’ची श्वेतपत्रिका जाहीर करा
महानगरपालिकेने शहरातील सर्व २४७ ग्रीन बेल्टची यादी, त्यांची सद्यस्थिती, अतिक्रमणाची माहिती आणि पुनर्विकासाचा आराखडा सार्वजनिक करावा. अन्यथा पर्यावरण दिनाचे कार्यक्रम हे केवळ दिखावा आणि फोटोसेशन असल्याची भावना अधिक बळावेल.
लातूरकरांचा थेट सवाल :
“आयुक्त महोदय, पर्यावरण दिनाच्या दिंड्या आणि सोशल मीडिया पोस्टमुळे शहर हिरवे होणार नाही. ८० अतिक्रमित ग्रीन बेल्ट मुक्त करून आणि गायब झालेल्या हिरवाईचा हिशेब देऊन दाखवा; तेव्हाच पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा खऱ्या अर्थाने विश्वासार्ह ठरतील.”




