
तीन दिवसांत संस्कृत गायन, श्लोक पठण, सुभाषिते आणि भाषण स्पर्धा; २३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर : भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या संस्कृत भाषेप्रती विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी, संस्कृतचे शास्त्रीय व सांस्कृतिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि या समृद्ध भाषेच्या जतनासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, या उद्देशाने श्री श्री रविशंकर प्राथमिक इंग्लिश स्कूल आणि संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री श्री रविशंकर विद्यालयात विश्व संस्कृत दिनानिमित्त तीन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये तब्बल २३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या निमित्ताने विद्यालयात संस्कृत गायन, भाषण, श्लोक वाचन, अध्ययन, सुभाषिते, अष्टके आणि संस्कृत गीत अशा विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतील श्लोक, सुभाषिते आणि गीतांचे प्रभावी सादरीकरण करून भारतीय संस्कृतीतील संस्कृतचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन राजर्षी शाहू महाविद्यालयातील संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा. विनय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कार्यकारी समन्वयक आशिष कोळगे होते. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विनया मराठे, उपमुख्याध्यापिका विशाखा पाटील, संस्कृत विभागप्रमुख आचार्य शेरसिंह शास्त्री आणि संस्कृत अध्यापक अभिजीत भड यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या. पहिल्या गटातील संस्कृत गायन स्पर्धेत श्रावणी संतोष कदम हिने प्रथम, अर्जुन लालासाहेब कदम आणि कुमारी दिव्यश्री शेखर मुठे यांनी द्वितीय, तर कुमारी तनुश्री मुंडे, कुमारी श्रेया कदम आणि कुमारी गौरवी अजित कदम यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ योग्यश्री गुट्टे आणि स्वरांजली डोळस यांना पारितोषिक देण्यात आले.
भाषण स्पर्धेत गौरवी अजित कदम हिने प्रथम, ईश्वरी भीमराव यादव हिने द्वितीय, तर प्रांजली कैलास गायकवाड हिने तृतीय क्रमांक मिळविला. पार्थ लक्ष्मीकांत कुलकर्णी याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
दुसऱ्या गटातील स्पर्धांमध्ये आरवी रामगोडी हिने प्रथम, रचना जांभळे हिने द्वितीय आणि आयुष भारती याने तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल अंकिता कांबळे, समृद्धी चव्हाण, कुमारी आराध्या वाकडे, अंकिता काळे, आनंदी पाटील, समर्थ गोडी आणि नवीन अकबर शेख यांना विशेष पारितोषिकांनी गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संस्कृत ही केवळ एक प्राचीन भाषा नसून भारताच्या ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा मूलभूत आधार असल्याचे नमूद केले. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता, आयुर्वेद, योग आणि विविध शास्त्रग्रंथांच्या माध्यमातून संस्कृतने जगाला समृद्ध ज्ञानपरंपरा दिली आहे. संस्कृत भाषेतील व्याकरणशुद्धता, शब्दसंपदा आणि विचारांची सुसूत्र मांडणी यामुळे आधुनिक काळातही या भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व कायम असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
विश्व संस्कृत दिनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची ओळख करून देण्याबरोबरच तिच्याबद्दलची भीती दूर करून भाषेप्रती प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. संस्कृतचे अध्ययन केवळ गुण मिळविण्यासाठी नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचे मूळ समजून घेण्यासाठी आवश्यक आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या उत्साहाचे आणि उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. संस्कृत भाषा ही भूतकाळाचा केवळ वारसा नसून वर्तमानाला समृद्ध करणारी आणि भविष्याला दिशा देणारी ज्ञानभाषा आहे, असा संदेश या तीन दिवसीय कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, संस्कृत विभाग, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
