
निलंगा, दि. १८ एप्रिल २०२५ –
भटके विमुक्त, बहुजन समाजाचा आधारवड, ज्वलंत भाष्यकार, साहित्यिक, समाजसुधारक, कार्यकर्ते आणि एक विचारवंत नेता विलास बाबुराव माने यांचे आज सकाळी ६ वाजता त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
विलास माने हे केवळ एक नेता नव्हते, तर ते फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीचे जिवंत प्रतीक होते. त्यांनी आपल्या कार्यकुशलतेतून निलंगा तालुक्याला एक वैचारिक आणि सामाजिक आंदोलनाचे केंद्र बनवले. भाषण, लेखन आणि कृतीच्या माध्यमातून त्यांनी वंचित, शोषित, भटके-विमुक्त समाजासाठी झगडत बहुजनांमध्ये आत्मसन्मान व अधिकाराची जाणीव निर्माण केली.
श्रमिक विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळा आणि वेणूताई चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा उभ्या करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे मराठवाड्यातील शिक्षण आणि चळवळीला बळकटी मिळाली.
त्यांच्या जाण्याने फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे मोठे नुकसान झाले असून एक निष्ठावंत विचारवंत हरपला आहे. जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर आज दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता, निलंगा येथील शांतिवन सार्वजनिक स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी भिक्खू सुमेधजी नागसेन, लक्ष्मण माने यांच्यासह हजारो कार्यकर्ते, चाहत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
मागे पत्नी, एक मुलगा, दोन सून, दोन मुली, जावई, नातवंडे आणि पुतणे असा त्यांचा मोठा परिवार आहे.
एक सच्चा भाष्यकार हरपला… बहुजन समाजाचा बुलंद आवाज आता काळाच्या पडद्याआड… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


कत्तीकार विलास माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली