
लातूरच्या विनाशकारी भूकंपानंतर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भक्कम पावले टाकणारी स्वयम् शिक्षण प्रयोग ही संस्था महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक, केरळ, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये कार्यरत आहे. महिला सक्षमीकरण, अन्न सुरक्षा, व्यवसायिकता-उद्योजकता, आरोग्य, स्वच्छता आणि ग्रामविकास या क्षेत्रांत संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

या संस्थेच्या स्वाभिमान प्रकल्पाच्या माध्यमातून लातूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये महिलांना उद्योगाभिमुख करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. आतापर्यंत २२,००० हून अधिक महिलांना या प्रकल्पात सामील करण्यात आले आहे. यापैकी १८,००० महिलांना व्यवसाय व उद्योजकतेचे दहा दिवसांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या प्रशिक्षणानंतर अनेक महिलांनी कृषी, कृषी-आधारित तसेच अकृषी क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत १८० प्रशिक्षक महिलांनी इतर महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

महिलांना व्यवसायासाठी आवश्यक असलेले यंत्र व अवजारांचे सहाय्य २० ते २५ मार्च दरम्यान दिले जाणार आहे. याशिवाय, २० मार्चनंतर तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून, या महिलांना विशेष प्रोत्साहन व गौरवही प्रदान केला जाणार आहे.

लातूर तालुक्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण राठोड, लीला सोमवंशी, दिलीप धवन, पल्लवी सगर, अश्विनी मंदे आणि साक्षी देशमुख हे समर्पितपणे कार्यरत आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असून, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक दृढ होत आहे.


