
“ओतीव नात्यातील अतीव प्रेमकथा” या टॅगलाईनसह सादर झालेलं उन्हातलं चांदणं हे नाटक केवळ कथा नाही, तर भावनिक गुंतवणुकीचा आणि वैचारिक प्रवासाचा अनुभव आहे. लातुरातल्या रंगकर्मींच्या एकत्रित प्रयत्नातून साकार झालेलं हे नाटक, कथानक, कविता आणि विचार यांची हृदयस्पर्शी जुळवणी करतं.

मूळ कथा, त्यावरील कविता आणि त्या अनुषंगाने लिहिलेली दोन अंकी नाट्यरचना यांचा प्रवास स्पर्धा ते व्यावसायिक मंचापर्यंत यशस्वीपणे गेला, हीच या प्रयोगाची खरी जमेची बाजू. दिग्दर्शक ऍड. शैलेश गोजमगुंडे यांचं नाट्यलेखन आणि सादरीकरण नाटकाला एका संवेदनशील उंचीवर घेऊन जातं.

प्रत्येक दृश्य, संवाद, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, अभिनय या प्रत्येक आघाडीवर नाटक परिपक्व वाटतं. कथा सरळ असूनही ती खोल अर्थवाही आहे. नाटक प्रेक्षकाला केवळ पाहणाऱ्याच्या भूमिकेत न ठेवता, त्याचा भाग बनवतं – विचार करायला भाग पाडतं.

“उन्हातलं चांदणं” ही एक जुगलबंदी आहे – लेखक, दिग्दर्शक, कवी आणि कलाकारांच्या मनमिळावू सहकार्याची. त्यामुळेच ते नाटक म्हणून नव्हे तर अनुभव म्हणून लक्षात राहतं.
या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका साकारलेले ॲड. शैलेश दादा गोजमगुंडे यांनी केवळ कथा सांगितली नाही, तर संपूर्ण मराठवाड्याचा सांस्कृतिक आत्मा रंगमंचावर उभा केला. मराठवाड्याने केवळ भाषा दिली नाही, तर विचार, भावभावना आणि साहित्याची अमूल्य परंपरा दिली आहे—हे त्यांनी “उन्हातलं चांदणं”मधून ठासून दाखवलं.
लातूरमधील लेखकाने एक व्यावसायिक नाटक लिहिलं, ते दिग्दर्शित केलं आणि प्रमुख भूमिका साकारली—हेच सिद्ध करतो की आता रंगभूमीवर मक्तेदारी कुणाचीच नाही. पहिल्याच प्रयोगात १००% व्यावसायिक प्रयोग अनुभवायला मिळणं ही पर्वणीच!
केवळ संवाद आणि अभिनयच नव्हे, तर प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य यानेही अनुभव समृद्ध केला. प्रकाशाचा नेमका वापर आणि अंतर्मनाला भिडणारं संगीत, आलाफ—सगळंच मनात घर करून बसणारं. नेपथ्याच्या बाबतीत मराठवाडा मागे आहे असं म्हणणाऱ्यांना आता हेच म्हणावं वाटतं—”आमचेही दिवस आलेत!” सुंदर, अर्थवाही नेपथ्याने नाटकाच्या दृश्य सौंदर्याला चार चांद लावले.
या नाटकातली आणखी एक विशेष बाब म्हणजे सर्व पात्रांना दिलेलं समान महत्त्व. डॉक्टर, नोकर, बायको, मुलगी—प्रत्येक पात्र आपली भूमिका न्यायाने साकारतं आणि प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसतं. प्रत्येक कलाकाराला संधी मिळाली आहे आपली कला खुलवण्याची, जी फार कमी नाटकांत पाहायला मिळते.
डॉ. स्वप्नजा यादव यांनी साकारलेली तारा आणि शुभ्रा ही दुहेरी भूमिका म्हणजे अभिनयाचं उत्कृष्ट उदाहरण. एक अवघड मानसिक पट सहजतेने उभा केला आहे.
प्रा. नवलाजी जाधव यांचा डॉ. जयंत—एक मानसोपचारतज्ञ—मनाची गुंतागुंत समजावून सांगणारा.
अभिषेक शिंदे यांनी साकारलेला रामू—प्रत्येक घरात असावा असा निष्ठावान नोकर, कुटुंबासाठी स्वतःला झोकून देणारा. त्याच्या एन्ट्रीनेच नाटकात जीव ओतला गेला.
आणि मग येतो शरद—शैलेश दादांचा अभिनय. जबाबदारीने भरलेला कुटुंबप्रमुख, कलावंत असणाऱ्या माणसाचं द्वंद्व, आणि त्याच्या मनातील सततचा विचारकल्लोळ दादांनी अत्यंत ताकदीने उभा केला आहे. नात्यांतील नाजूक धाग्यांचं संवेदनशील चित्रण त्यांनी केवळ अभिनयातून नव्हे तर शब्दातूनही केलं आहे.
“उन्हातलं चांदणं” हे शीर्षक पहिल्यांदा ऐकताना वाटतं, उन्हात चांदणं कुठून उगवणार? पण जेव्हा माणसाच्या मनात प्रेम, आपुलकी आणि शीतलतेचा झरा वाहतो, तेव्हा त्या रखरखत्या वास्तवातही चांदणं उगवतं—ते या नाटकाने पटवून दिलं.
नवीन संसार सुरू करणाऱ्या जोडप्यांनी हे नाटक नक्की एकदा तरी जोडीने पाहावं—कदाचित त्यांच्या नात्यांतलं ऊन चांदणं बनून शीतल होईल. नात्यांमधले प्रश्न, दुवे, संवाद, गोंधळ, राग, समज-गैरसमज… या सगळ्यांना नाटकाने केव्हातरी हसत, केव्हातरी थेट काळजाला भिडवत उत्तरं दिली आहेत.
शेवटी एवढंच म्हणावं वाटतं—
हे नाटक केवळ एक प्रयोग नव्हे, तर एक अनुभव आहे.
सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, थ्रिल आणि उत्कंठा अशा अनेक अंगांनी नटलेला हा अनुभव आहे
थोडक्यात – हे नाटक एकदा पाहायलाच हवं, कारण ते केवळ रंगमंचीय प्रयोग नसून, आयुष्याला भिडणारं, अंतर्मुख करणारं आणि संवेदना जागवणारं नाट्यसंवेदन आहे.



