
सामाजिक भान, राजकीय दूरदृष्टी आणि लोककल्याणाचा ध्यास यांचे उत्तम मिश्रण असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. दिलीपराव दगडोजीराव देशमुख. आज त्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा – अमृतमहोत्सवी वाढदिवस – आपण साजरा करत आहोत, ही समस्त लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

राजकारणात त्यांच्या प्रवासाची सुरुवात त्यांच्या बंधू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांच्या पाठबळामुळे झाली. विलासरावजींच्या वाढत्या राजकीय जबाबदाऱ्यांत त्यांना साथ देण्यासाठी एका कणखर, कर्तबगार आणि स्पष्टवक्त्या नेतृत्वाची गरज होती – ही भूमिका दिलीपराव देशमुख यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सुरुवात जिल्हा परिषदेपासून केली. लातूर जिल्हा परिषद मागास असूनही त्यांनी ती राज्यातील क्रमांक एकच्या स्थानावर नेली – ही त्यांच्या कार्यक्षमतेची पहिली झलक होती. त्यानंतर सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान विशेषत्वाने उल्लेखनीय आहे. मांजरा परिवारातील सहकारी साखर कारखाने, तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना मिळालेली शिस्त, प्रगती आणि लोकहितकारी धोरणे ही दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वगुणांची साक्ष आहेत.

शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांनी कन्यादान योजना सुरू करून गोरगरीब कुटुंबीयांना दिलासा दिला. खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा त्यांचा क्रांतिकारी निर्णय होता. तसेच, ऊस कापणीसाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देत अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये नवजीवन फुंकण्याचे काम त्यांनी केले.

राजकीय कारकिर्दीत ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि राज्याचे अर्थ राज्यमंत्री या पदावर त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी अर्थविभागामध्ये शिस्त लावली आणि कार्यक्षमतेची नवीन पातळी गाठली. तत्कालीन अर्थमंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांच्या कार्याचा सार्वजनिक गौरव केल्याने त्यांच्या कामाची व्यापक दखल घेतली गेली.

राजकारणाच्या परिघाबाहेर राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांची जनतेशी असलेली नाळ इतकी घट्ट होती की ते सतत सामाजिक कार्यात सक्रीय राहिले. जीवनाच्या एका टप्प्यावर कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देऊन त्यांनी पुनश्च उभारी घेतली. आज ते ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, हे त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे.

त्यांचं आयुष्य हे कर्तृत्व, समर्पण आणि सेवा या मूल्यांची साक्ष आहे. आज त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. लातूर जिल्ह्याचा जो विकास आज दिसतो, त्या प्रत्येक पायरीमागे दिलीपराव देशमुख यांचं भक्कम योगदान आहे, हे अभिमानाने म्हणता येईल.
या महान नेतृत्वाच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवा करण्याची ऊर्जा लाभो, हीच प्रार्थना.
– शतशः शुभेच्छा …!!!
- दिपरत्न निलंगेकर, संपादक दै युतीचक्र, जिल्हा प्रतिनिधी DD News

