
लातूर – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मत व्यक्त केले. या परिषदेत त्यांनी दलित आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला चालना दिली असून, त्यांच्या पक्षाच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या.
दलित-आदिवासींसाठी नोकरीत आरक्षणाची मागणी
आठवले म्हणाले की, “अजूनही अनेक क्षेत्रांत दलित आणि आदिवासी समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्या क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळावे, ही आमच्या पक्षाची ठाम मागणी आहे. हे सामाजिक समता आणि न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.”

महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावा
बिहारमधील ऐतिहासिक महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. या विहाराचा ताबा बौद्ध भिक्षूंना मिळावा यासाठी आपल्या पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे आठवले यांनी सांगितले. “या मागणीला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. बौद्ध भिक्खूंना त्यांच्या धर्मस्थळावर हक्क असावा,” असे ते म्हणाले.
शैक्षणिक धोरणावर राज ठाकरे यांना टोला

पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या शैक्षणिक धोरणाबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरही आठवले यांनी टीका केली. “शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी असते. त्यामागे केंद्र आणि राज्य सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ते सर्वांगीण विचार करूनच घेतले आहेत. राज ठाकरे यांनी या धोरणाबाबत योग्य माहिती घेणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “मराठी भाषेचा जपणूक करणं चांगली गोष्ट आहे, पण केवळ आपणच एकटे त्याचे रक्षण करतो आणि इतरांना त्याचा विरोध करत असल्याचा आव आणणं योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वांनीच विचारपूर्वक भूमिका घ्यायला हवी.”

