मनी मसल पॉवरवाल्यांपासून सावधान !
बहुजनांच्या संघर्षमय समाजात माणसाच्या विरोधात माणूस उभा करणे हे व्यवस्थेचे जुने गणित आहे. या गणिताला आज आपण वजा केले पाहिजे , मुळात आपण माणूस म्हणून कसे उभे राहिलो. हा विचार आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने करायला हवा, आपल्या पूर्वजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन आपलं राजकीय , सामाजिक मार्गक्रमण आपण समजायला आणि ओळखायला पाहिजे. कारण आपल्या समाजातील व्यवस्थेच्या लाभार्थी मधून गब्बर झालेली माणसं ही आपलीच प्रचंड संघर्षातून निर्माण झालेली स्वाभिमानी असलेली आंबेडकरी चळवळ खुडायला बसली आहे. स्वतःच्या वीतभर स्वार्थासाठी समाज दावणीला बांधण्याची भाषा करतात हे आपल्या समस्त चळवळी साठी वा समाजासाठी अत्यंत घातक आहे. याला कुठे तरी आवर घालने काळाची गरज आहे. कारण समाज निर्मिती साठी स्वाभिमान समाज तसेच कार्यकर्ता असणे महत्वाचे आहे. या संदर्भात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या पंचावन्न वाढदिवस निमित्त संदेश देतात.
” ग्रीक कवी होमरच्या महाकाव्यातील डीमेटर नावाची देवता या विश्वाच्या उद्धाराकरिता आपण एक महापुरुष घडविला पाहिजे , या भावनेने झपाटलेली असते. ती त्याचा शोध घेत किलॉस राज्याच्या राज्यात येते. ती आपला वेश बदलून असल्यामुळे राजा तिला आपल्या मिटोनेरिया राणीची दासी म्हणून सेवेला ठेवतो.
राणी तिला आपल्या तान्ह्या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी सोपविते दिवसभर ती त्या बाळाचे संगोपन करते आणि रात्री त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून त्याला धगधगत्या निखाऱ्यावर ठेवते . उद्देश हा आहे की , त्या बाळाच्या अंगात आगीची धग सोसण्याची क्षमता यावी. बाळातही आगीची धग सोसण्याची क्षमता वाढीस लागते. एकदा सहज रात्रीच्या वेळी राणी या दासीच्या कक्षात डोकावून बघते तर आपले बाळ धगधगत्या निखाऱ्यावर ठेवलेले बघून मातृत्वाचे ओथंबलेली राणी बाळाला उचलून जवळ घेते त्या बाळाचे नाव असते डेमोफून “
सांगायचे तात्पर्य ऐवढेच की माझा कार्यकर्ता हा ताऊन सुलाखून मजबूत असायला हवा त्याला सामाजिक जाणिव असणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतू बाबासाहेब गेल्यापाठी समाजात स्वतःच्या स्वार्था साठी वेगवेगळी गटबाजी होऊन समाज हतबल झाला. परंतू या समाजाला सावरण्यासाठी सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या पासून ते श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाला सत्तेत येण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सोशल इंजिनियर करून सत्तेचा वाटा मिळण्यासाठी धडपडत आहेत. परंतू आपल्यातीलच महाभाग व्यवस्थेच्या आहारी जाऊन स्वतःच्या स्वार्थासाठी समाज खीळ खिळा करत असल्याचे दिसून येते म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात ” इथं मी हरत नाही तुम्ही मला हरवता ” हे वास्तव बघून बाबासाहेबांचा संघर्ष डोळ्यासमोर येतो. म्हणून महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात.
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे.करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.
म्हणजे आज माझा निळा झेंडा फडफडताना काय म्हणत असेल ? कारण आमची ही स्वाभिमानाची चळवळ एका रात्रीतून जन्माला आली नाही. या साठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान केलेले आहे. आणि याच वाटेने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गक्रमण आहे. हे आपण सर्वांनी विसरता कामा नये. ज्यांनी आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात खस्ता खाल्ल्या या चळवळीचा मतितार्थ त्यांनाच समजेल . परंतू झेंडा वेगळा दांडा वेगळा होत असताना आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला प्रचंड वेदना होतात. कारण समाजातील काही माणसं आपली झोपडी सोडून हवेलीच्या नांदी लागल्याने आज समाजाची प्रचंड दुर्दशा झाल्याचे दिसून येत आहे. बेरोजगारीने थैमान घातला आहे. अन्याय अत्याचार वाढला आहे. समाजात गटबाजीचे प्रमाण वाढले आहे. आपल्या माणसाबद्दल आपल्याला जिव्हाळा राहिलेला नाही. याचे कारण काय ? या मागचा मास्टर माईंड आपण ओळखला पाहिजे ? कारण काय तर येथील प्रस्थापित व्यवस्थेला आंबेडकरी नेतृत्व सेट होऊ द्यायचे नाही. म्हणून ते आपल्या समाजातील गल्ली बोळातील माणसाला प्रचंड प्रमाणात आमिष दाखवून त्याला आपल्या जाळ्यात अडकवतात. व समाज कसा येथील प्रस्थापित गब्बरांच्या दावणीला बांधता येईल या वर ते चर्चा करतात आणि आंबेडकरी नेतृत्वाच्या राजगृहाला आपल्याच माणसाच्या हातून हादरे देण्याचे काम करतात. कारण त्यांना आज पर्यंत बाबासाहेब समजले नाहीत म्हणून ते व्यवस्थेच्या जाळ्यात सहज अटकतात. म्हणून ज्यांना बाबासाहेब समजले त्यांनाच बाळासाहेब समजतील कारण बाबासाहेबांचा आणि बाळासाहेबांचा सत्ता संपादनाचा मार्ग एकच आहे. जेव्हा आपण बाबासाहेबांचे विचार चिंतन मंथन करू तेव्हा आपल्याला श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकीय सामाजिकतेचा मार्ग कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिल्यांदा बाबासाहेबांना समजून घ्या म्हणजे आपण सर्व प्रकाशाच्या दिशेने जाऊ यातच आपल्या सर्वांचे हित आहे.
आज समाजामध्ये निष्ठा आणि भूमिका स्पष्ट दिसण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मतभेदाची झाडे वाढू देऊ नका.
” आपल्या समाजात आपापसात फार मतभेद आहेत. ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नाहीत. त्या मतभेदाचा झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात. त्यांचे मतभेद त्यांच्या मुलांच्याही पोटात वाढतात. अशा रीतीने मतभेद वाढतच जातात. हा गुणधर्म आपल्या लोकांत जास्त प्रमाणात आहे. काँग्रेस सारख्या पक्षात सुद्धा मतभेद आहेत. त्या बरोबरच त्यांच्या जवळ काही सद्गुण आहेत, असे अनुभवाने म्हणावे लागते. त्यांचा एक गुण फार महत्वाचा आहे. तो म्हणजे बहुमताने ठरलेले सर्व मान्य करतात. ही कृती राजकारणात फार आवश्यक आहे. “माझ्या मताप्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहीन ” अशी प्रवृत्ती फार वाईट . दुसरी गोष्ट आपले मन निर्मळ पाहिजे . त्यामुळे आप आपसातील मतभेद नाहीसे होतात. राजकारणात भांडणे होतात. ती विसरून जाण्याची सवय ठेवली पाहिजे . त्या भांडणाचे झाड मनात वाढू देणे , हा स्वभाव बरा नाही . माणसाचे मन फुला प्रमाणे निर्मळ , स्वच्छ असावे लागते. “आजच्या परिस्थितीचे भान ठेऊन सर्वच वंचित बहुजन समाजाने आपल्या हक्काचे आरक्षण धोक्यात असल्यामुळे आपण सर्वांनी आपली एक सामाजिक जबाबदारी व बांधिलकी म्हणून श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून उभारलेल्या माणसाच्या हक्कासाठीच्या लढ्यात आपण सहभागी होऊन प्रस्थपित काँग्रेस व भाजप वाल्यांनी आरक्षणावर आणलेले संकटे सावरण्यासाठी आपल्या हक्काचे आरक्षण वाचविण्यासाठी आज आपण बाळासाहेबांच्या एका हाकेला ओ देणे त्यांच्या सोबत राहणे काळाची गरज आहे. आता मागचा पुढचा इतिहास उकरून काढण्यात आपआपल्या स्वार्थासाठी असलेल्या भांडणात गुंतून न राहता . आपल्याला सीमेवरील नौ जवान सारखे तैनात राहणे अत्यंत महत्वाचे आहे. येणारी विधान सभेची लढाई ही आपल्या अस्मितेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणून या वेळेस सर्वच बहुजन समजतील वेगवेगळ्या समूहाने सामाजिक भान जागृत ठेवून आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे ओबीसी चे शंभर आमदार आणि एससी , एसटी चे चौपन्न आमदार निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणजेच आपआपसातील हेवेदावे बाजूला ठेऊन ओबीसी मतदारांनी एस सी, एस टी च्या उमेदवारांना मतदान करावे व एस सी, एस टी मतदारांनी ओबीसी उमेदवारांना मतदान करावे तरच आपण आपल्या हक्काचे आरक्षण वाचवू शकतो. काळ वैरी आहे प्रचंड वाईट आहे म्हणून समाजातील जबाबदार व समजदार यांनी आप आपल्या जात समूहात जाऊन , कॉर्नर मीटिंग घेऊन हितगुज करावे . बाळासाहेब आरक्षण वाचविण्यासाठी रात्रं दिवस संघर्ष करत आहेत. आपल्या घासातील घास वाचविण्यासाठी लढत आहेत. हे आप आपल्या घरी जाऊन सांगा . स्वाभिमानी उजेडाच्या मार्गाने मार्गस्थ होण्यासाठी हीच ती वेळ आहे. कारण या वेळी राजकारणाला राजकारण म्हणून बघू नका ” आरक्षण धोक्यात आहे भाजप शिंदे सरकारची मुदत संपतानाही एस सी एस टी आरक्षण क्रिमिलेअर आणि उप वर्गीकरण करण्याचा सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जी.आर. काढला आहे. आरक्षण विरोधी निर्णयाला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षांचा पाठिंबा आहे. म्हणजेच एस सी, एस टी, ओबीसी आरक्षण धोक्यात आले म्हणून इथल्या मनी मसल पॉवरवाल्यांपासून बहुजन समाजाने सावध राहायला पाहिजे. त्यांच्या कुठल्याच आमिषाला बळी न पडता आपल्या स्वाभिमानी मार्ग समृध्द करावा आपला घासातील घास वाचविण्यासाठी चला बाळासाहेबांना साथ देऊया



