वीज ग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रारंभ

लातूर, दि. २६ सप्टेंबर : वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा अधिक वेगाने व सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात तसेच सौरऊर्जा योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी महावितरणकडून ‘सेवा सेतू अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तहसील कार्यालय लातूर येथे विशेष किऑस्क सेंटर उभारण्यात आले असून, या किऑस्कवर विविध सौर योजनांसह महावितरणच्या विविध सेवांची माहिती व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना किऑस्कवर माहिती देण्यात येत आहे. योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, आर्थिक लाभ, सौर संच बसविण्याची कार्यपद्धती, अंदाजित खर्च तसेच कर्ज सुविधेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. निवडसूचीवरील सौर कंत्राटदारांच्या माध्यमातून आवश्यक माहिती व समन्वय उपलब्ध करून देण्यात येत आहे.
काल (दि.२४) पासून सुरू झालेल्या या सेंटरला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात ४३ नागरिकांनी भेट देऊन सौर योजना व महावितरणच्या विविध सेवांची माहिती घेतली आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी कार्यकारी अभिंय्रता अनिरूध्द घाटगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे प्रयत्न करत असून सहाय्यक अभियंता अमोल जाधव, कनिष्ठ अभियंता रामलिंगेश्वर बावगे व लेखा लिपिक रवी वाळके प्रत्यक्ष नागरिकांना माहिती देत आहेत.
१७ ऑक्टोबर पर्यंत हे किऑस्क सेंटर उपलब्ध असणार असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी या विशेष किऑस्क सेंटरला भेट देऊन सौर योजनांचा लाभ घ्यावा असे महावितरणने आवाहन केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने वीजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून विशेष सेवा कक्ष उभारून येत्या १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या सेवा सेतू अभियानात नवीन घरगुती वीजजोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलून देणे, वीज बिलावरील नावात बदल करणे, मंजूर भार बदलणे, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये आवश्यकतेनुसार स्पेसर बसवणे, इतर तांत्रिक उपाययोजना, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती आदींना वेग देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. सेवा सेतू व सेवा संकल्प अभियानात एकाच छत्राखाली उपलब्ध सर्व सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा – सचिन तालेवार, संचालक (प्रकल्प) महावितरण
फोटो ओळ: तहसील कार्यालय लातूर येथे नागरिकांना माहिती देताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे व इतर अधिकारी
