गांडुळ खत निर्मिती करुन आम्ही आमच्या शेतातील मातीची गुणवत्ता नक्की वाढणार व सत्वयुक्त व शुध्द अन्नधान्याची आम्ही निर्मिती करणार आहाेत.
.... काजल अजगरे
औसा : जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च २०२६ रोजी मोजे शिंदाळा लो. (ता. औसा जि लातूर) येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने शेतकरी महिलांसाठी मोफत वर्मी बेड व भाजीपाला बियाणे किट वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. संस्थेच्या स्वावलंबन प्रकल्पांतर्गत औसा तालुक्यातील ८५ गावांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावपातळीवरील महिलांना सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय, उद्योजकता, व्यवसायिकता तसेच कौशल्य विकास यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येते. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे व स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहावे या उद्देशाने संस्थेमार्फत हे उपक्रम राबवले जात आहेत.
८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र लातूर जिल्ह्यात ८ मार्च रोजी रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्यामुळे, या उपक्रमाचे आयोजन ९ मार्च रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात ६० गावांतील ६० शेतकरी महिलांना मोफत वर्मी बेड तसेच विविध भाजीपाला बियाणे किट वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध गावांतील लीडर सखी, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी, शिंदाळा गावाचे सरपंच, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. तसेच स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या स्वावलंबन प्रकल्पाचे औसा तालुका समन्वयक प्रवीण राठोड, परिसर समन्वयक सुमित्रा जाधव, मीरा साठे व ओमकार भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम घेण्याची संकल्पना प्रकल्प समन्वयक दीपक लांडगे यांची होती.
कार्यक्रमाद्वारे महिलांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहन देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आणि महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Good लय भारी