बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम

लातूर, दि.२६ सप्टेंबर : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरावे आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
२८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याने बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक वीज ग्राहक आपले वीजबिल धनादेशाद्वारे भरतात. त्यामुळे या कालावधीत वीजबिल भरणा व संकलन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. ज्या वीज ग्राहकांची प्रॉम्प्ट पेमेंट (तत्पर देयक भरणा) तसेच ड्यू डेट (अंतिम भरणा दिनांक) २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमधील असेल अशा सर्व ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरावे. महावितरणची अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप तसेच उपलब्ध डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर करून घरबसल्या वीजबिलाचा भरणा २८ सप्टेंबरपूर्वी करावा. तसेच, प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी तसेच विलंब आकार टाळण्यासाठी ग्राहकांनी देय तारखेपूर्वी वीजबिल भरावे. लातूर परिमंडलांतर्गत लातूर, धाराशिव व बीड मंडलातील बहुसंख्य ग्राहक प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने वेळेत वीजबिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे होणारी संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने आहे.
