रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 ला सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे हे ग्रहण रात्री एक वाजेपर्यंत असेल. भ्रमणावस्थे मध्ये जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते त्यावेळेस पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते त्याला आपण चंद्राला ग्रहण लागले असे संबोधतो.परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा सावल्यांचा खेळ आहे. चंद्रग्रहण हे प्रामुख्याने पौर्णिमेच्या रात्रीच लागते खरं तर प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका दिशेमध्ये येत असतात पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण लागत नाही याचे कारण पृथ्वी व चंद्र यांच्या परिभ्रमण प्रतलात 5.25 अंशाचा कोन आहे. हा कोण वर्षातून दोनदा किंवा क्वचित प्रसंगी तीनदा कमी होऊन सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका दिशेमध्ये येतात, त्यावेळेस चंद्रग्रहण लागते. म्हणजे चंद्रबिंब पृथ्वीच्या सावलीत अंशतः किंवा पूर्णतः काही कालावधीसाठी छायांकित होते या घटनेस चंद्रग्रहण असे म्हणतात, ही केवळ खगोलीय घटना आहे तरीही समाजामध्ये चंद्रग्रहणाबद्दल किंवा सूर्यग्रहणाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहाच्या वेळी राक्षसांनी त्यांना गिळंकृत केले आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा आहेत ग्रहण काळात गरोदर स्त्रीने कांदा, भाज्या कापू नये, ग्रहण पाहू नये, ग्रहण काळात घरातील शिजवलेले शिल्लक अन्न सेवन करू नये, घरातील अगोदरचे पाणी ग्रहणानंतर वापरू नये ते सर्व पाणी सांडून टाकावे, घराच्या बाहेर पडू नये, ग्रहणाच्या वेळी जन्मलेल्या बाळाला बाधा येते ते चांगले नसते.तसेच ग्रहण हे अधोगतीचे लक्षण आहे, ग्रहण हे दैवी संकटाचे किंवा युद्धाचे संकेत असतात, सर्व संकटांचे मूळ म्हणजे ग्रहण, ग्रहण काळात कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करू नये यासारख्या अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेल्या आहेत. काही ‘जाणते’ लोक तर ग्रहण लागण्याच्या अगोदर पाण्यात बसतात आणि ग्रहण सुटल्यानंतरच पाण्याच्या बाहेर येतात असेही ऐकले आहे. परंतु या कोणत्याही घटनेशी चंद्रग्रहणाचा कुठलाही कसलाही संबंध नाही. फक्त पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्राला ग्रहण लागते ही केवळ नैसर्गिक व खगोलीय घटना आहे त्याचा वरील कोणत्याही घटकावर कसलाही विपरीत परिणाम होत नाही त्याचे अनेक उदाहरणे व दाखले महा.अंनिसकडे आहेत. काही स्त्रियांनी ग्रहण काळात कांदा चिरला,अन्न खाल्ले, एवढेच नाही तर काही स्त्रियांची या कालखंडामध्ये डिलिव्हरी झाली आणि बाळ सुखरूप जन्मले देखील, ग्रहण काळातील सर्व पाणी सांडून टाकले त्यानंतर जे नळाचे पाणी भरले जाते तेही पाण्याच्या टाकीतील पाणी हे ग्राहणळातीलच असते, समजा तेही पाण्याची टाकी रिकामी केली आणि नंतर ती टाकी भरली तर भरलेले पाणी ही धरणातले असते ते ही ग्रहण काळातीलच येणार आहे. यामुळे कोणत्याही नागरिकांनी घाबरून न जाता अशा भ्रामक कल्पनावर विश्वास न ठेवता आपली दैनंदिन कामे नियमितपणे करावेत. असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष
मा.माधव बावगे, राज्य प्रधान सचिव रुकसाना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार,अनिल दरेकर, रणजीत आचार्य, बाबा हालकुडे, लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, उपाध्यक्ष अजित निंबाळकर, सुनीता अरळीकर , जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ.दशरथ भिसे, प्रधान सचिव सुधीर भोसले, लातूर शहराध्यक्ष बब्रुवान गोंमसाळे, लातूर शहर कार्याध्यक्ष डॉ . गणेश गोमारे यांनी केले आहे.

