
लातूर – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समारोप दिनानिमित्त जी 24 वतीने लातूर शहरातील अंजनी सभागृह येथे जनसुरक्षा कायदा लोकशाहीसाठी घातक विषयावर इतिहास तज्ञ तथा विचारवंत सोमनाथ रोडे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंचावर कामगार नेते राजकुमार होळीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. जन सुरक्षा कायदा लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत यावेळी डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी जन सुरक्षा कायद्याचे स्वरूप, कलम निहाय विश्लेषण,संभाव्य धोके,आक्षेप,विसंगती या संदर्भात भाष्य केले ते पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्राच्या विधिमंडळात हा कायदा बहुमतने मंजूर करण्यात आला.मार्क्सवादी पक्षाचे आमदार यांच्या व्यतिरिक्त कायद्याला विरोध दर्शवणारी भूमिका विरोधकांनी मांडली नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भाषण,अभिव्यक्ती, विचार स्वातंत्र्य दिले आहे. या सर्वावर घाला घालणारा हा कायदा आहे. हा केवळ कायदा नसून फॅसिस्ट विचारसरणी यामध्ये जोडली आहे. या कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास हा गुन्हा अजामीन पात्र आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार सरकार पुढील काळात नक्षलवाद संपणार असेल तर हा कायदाच कशाला आणला आहे. असे परखड मत यावेळी त्यांनी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कामगार नेते राजकुमार होळीकर यांनी या कायद्याविषयी सखोल माहिती दिली. कलम 19 आणि 21 नुसार राज्यातील चळवळीवर कशा पद्धतीने धोका व परिणाम होणार आहे यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले ते पुढे बोलताना म्हणाले की एखादी व्यक्ती अथवा संघटना या कायद्यानुसार बेकायदेशीर सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या प्रत्येक गोष्टीला बेकायदेशीर ठरवणारा हा कायदा रद्द झाला पाहिजे असे मत यावेळी होळीकर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास जी 24 पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

