
नवी दिल्ली (प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व समाजसेवक डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे यांना शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय व बहुआयामी योगदानाबद्दल भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने आयोजित भव्य समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.
भव्य सोहळा व मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला व्यासपीठावर राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्यासोबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी तसेच मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशभरातील निवडक ४५ उत्कृष्ट शालेय
शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. जगदाळे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

पंतप्रधानांशी संवाद
दिनांक ४ सप्टेंबर रोजी विज्ञान भवनातील कार्यक्रमापूर्वी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शिक्षक पुरस्कारप्राप्तांशी त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर व नव्या संधींवर चर्चा करताना पंतप्रधानांनी शिक्षक हेच राष्ट्रनिर्मितीचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले.
यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अशोक हॉटेल येथे सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांसाठी विशेष सत्कार सोहळा व भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
डॉ. संदीपान जगदाळे यांचे योगदान
डॉ. संदीपान जगदाळे हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून शिक्षण, संशोधन व समाजकारण या क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत.
- संगीत शिक्षण: त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीत व लोकसंगीताबद्दल जागरूकता निर्माण केली असून अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
- सांस्कृतिक उपक्रम: युवक महोत्सव, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना जागृत केली आहे.
- नवोन्मेषी प्रयोग: डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी व सुलभ केले. विशेषत: ब्रेल लिपीत पुस्तके तयार करणे, स्थानिक बोलीभाषेत FLN पुस्तके लिहिणे, तसेच ICT आधारित अध्यापनपद्धती विकसित करणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
- समाजाभिमुख उपक्रम: राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक जबाबदारी, विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले.
शिक्षक नव्हे तर समाजदूत
डॉ. जगदाळे हे केवळ शिक्षक नसून समाजसेवक, लेखक, सांस्कृतिक दूत, डिजिटल इनोव्हेटर व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रेरक आहेत. त्यांच्या कामगिरीतून शिक्षणाचा सामाजिक परिवर्तनासाठी कसा उपयोग होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण दिसून येते.
महाराष्ट्राचा अभिमान
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा देशातील शिक्षकांसाठी सर्वोच्च सन्मान मानला जातो. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याने केवळ डॉ. जगदाळे यांचा व्यक्तिगत सन्मान झाला नाही, तर महाराष्ट्राच्या संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला आहे.
या यशाबद्दल मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस
- उपमुख्यमंत्री – एकनाथ शिंदे, अजित पवार
- शिक्षणमंत्री – दादाजी भुसे
- शिक्षण संचालक – डॉ. महेश पालकर
- दयानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी – अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा इ.
- शिक्षण उपसंचालक डॉ दत्तात्रय मठपती, डायटचे प्राचार्य डॉ मारुती सलगर, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी व डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित व कार्यालय अधीक्षक संजय व्यास,
महाराष्ट्रातील शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, सरकारी अधिकारी, तसेच असंख्य विद्यार्थी व सहकारी शिक्षकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

