पुस्तकी शिक्षणा सोबतच जगण्याचे शिक्षण देताहेत
एकञ कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असताना अनाथ, एकल पालक असलेल्या ५५ लेकरांचे आई बाप बनून त्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकवून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी झटणारे दाम्पत्य म्हणजे संगिता आणि शरद झरे हे होय. एखाद्या चित्रपटाची पटकथा शोभावी असे जीवन जगलेल्या शरद झरे चे काम पाहिल्यावर सामाजिक जाणिवेचा कर्मवीर असेच म्हणावे लागेल.
निलंगा तालुक्यातील वडगाव या दोन हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गावात जन्मलेला शरद केशवराव झरे हा युवक कायमचं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचे हेच जीवनाचे ध्येय ठरवून आटली वाटचाल करत होता. आई – वडील, २ भाऊ, ४ बहिणी असा मोठा परिवार. वडील शिक्षक तरीही त्यांची आशी इच्छा होती की, शरदने शेतीच करावी. शिक्षणापेक्षा शेतीमधील सर्व कामे त्याने शिकली पाहिजे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. आई सोबत शेतातील प्रत्येक कामात मदत करत असल्याने शेतातील सर्व कामे शिकली. शिक्षणाची आवड असल्याने वडीलांकडे हट्ट धरून आठवी ते बारावीपर्यंत चे शिक्षण कसेबसे पुर्ण केले. याकाळात शाळा महाविद्यालयात कमी आणि शेतीतील कामे अधिक असाच जीवनक्रम शरदचा राहीला.
पुढील शिक्षण घेण्यासाठी लातूर येथे जाण्याचा निर्णय घेतला. वडीलांनी निलंगा येथे शिकावे आणि घरी रहावे असे सांगितले. बाहेर राहणार असाल तर मी काही आर्थिक मदत करणार नाही असे सांगून टाकले. 12 वी. मध्ये शिकत असताना शेतकरी नेते शरद जोशी यांचे भाषण ऐकले तसेच शेतकरी नेते लक्ष्मणराव वंगे यांनी शेतीचा उत्पादन खर्च काढून शेती हा व्यवसाय कसा तोट्याचा आहे हे लक्षात आणून दिले. त्यानंतर शेती परवडत नाही हे गणित हे ध्यानात आले. बारावी मध्ये असतानाच शेतीसाठी झालेला खर्च आणि आलेले उत्पन्न पाहिले तर एकाची मंजुरी सुध्दा निघत नाही हे लक्षात आले आणि शेती सोडून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
पुढे लातूर येथील शाहू महाविद्यालयात कमवा आणि शिका या योजनेतून काम करुन शिक्षण घेतले. बी.ए करत असताना महाविद्यालयाच्या वतीने झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठीचे काम हाती घेतले. यापूर्वी अनेकजण शिकवण्यासाठी आले पण दोन चार विद्यार्थी येत होते. शरद झरे यांनी मुलांना बिस्किटे, चाॅकलेट वाटप करुन मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्यामुळे शिकण्यासाठी मुलांची संख्या वाढू लागली. हाळूहाळू ही संख्या ६५ पर्यंत पोहोचली. पुढे हे काम सहा महिने केले. पञकारितेच्या क्षेत्रात काम करायचे ठरवून बीजे, एम जे पुर्ण केले. थेट पेपर टाकण्याचेही काम केले. स्थानिक दैनिकात काम केले.
गावात तीव्र पाणीटंचाई होती. पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन महिला विहिरी मध्ये पडून जखमी झाल्या. गावातील मातब्बर पुढारी ही समस्या सोडविण्यासाठी काहीच करत नव्हते. त्यांना सांगितले तर त्यांनी उलट अपमान करुन पाठवलं. गावात वृक्षलागवड, रक्तदान शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, स्वच्छता मोहिम यांसारख्या सामाजिक कामाचा झपाटा लावला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. असे विविध समाजोपयोगी कार्य केले. दरम्यान च्या काळात
ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि पॅनल उभा करण्यासाठी गावातील सर्व तरुणांना एकञ केले. गावातल्या मातब्बर पुढाऱ्यांनी शरद सोबत असणाऱ्या मुलांच्या बापांना धमकावत निवडणुकीत न उतरण्याचा दम भरला. सर्व तरुण गायब झाले. गावातील एका गटाने मदत केली. ७ पैकी ६ जागा निवडून आल्या. सरपंच पद मिळाले. पद हाती येताच गावातील तीन अवैध दारु दुकाने बंद करून टाकली. गावात कोणालाही गुटखा विक्री करता येऊ नये म्हणून ग्रामसभेत गुटखा बंदीचा ठराव घेतला. सरपंच झाल्यावर गावातील महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला आणि दुसऱ्या दिवशी थेट जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच निवेदन द्यायला जाऊन उपोषणास बसल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी शरद झरे यांच्या धाडसाचे कौतुक करून केवळ एका दिवसात गावाचा तात्पुरता पाणी प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करून साधारण चार कि.मी. मसलगा डॅम वरून पाणी आणून गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला. पुढे दिड वर्षांनंतर अविश्वास प्रस्ताव आणून पदावरून दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला. गावातील विरोधकांनी घरात भांडणे लावून बेबनाव निर्माण केला. ग्रामीण भागातील खालच्या पातळीवरचे राजकारण ही या निमित्ताने तरूण असलेल्या शरद झरे यांच्या लक्षात आले. गावाचा सर्वांगीण विकास करावा, शिक्षण, आरोग्य तसेच गावाची आर्थिक उन्नती साधावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावात गेलेल्या शरद ने स्वतः होऊन राजीनामा देऊन कायमच गाव सोडलं.
दरम्यान च्या काळात मोठ्या प्रमाणात कर्ज झाले. ते फेडण्यासाठी थेट पुणे गाठले. भाजीपाला विक्री चे दुकान टाकले. हॉटेल ला भाजी पुरवठा करण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये चांगला जम बसला आणि तब्बल 10 जण हाताखाली कामाला ठेवले. दोन वाहने भाजीपाला पुरवठ्यासाठी घेतलेली. तब्बल चार वर्षे हे काम करून आपल्यावरच सर्व कर्ज फेडलं. कर्ज फिटल्यानंतर आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा आपण प्रयत्न केला होता परंतु आपण पैसे कमवण्यात आपला वेळ घालत आहोत असे वाटू लागले आणि हा जम बसलेला दरमाहा किमान दोन लाख रूपये मिळणारा व्यवसाय बंद करून स्वतःला आवडणारे काम करायचे हा दृढ संकल्प केला.
याच दरम्यान शिक्षणापासून, निराधार मुलं त्याच्या आयुष्यात आली. या वंचित मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे,ते स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजेत असा विचार करून यात काम करण्याचे ठरवले. लग्न करत असताना अगोदरच पत्नीला सर्व सांगितले होते. मला जे आवडेल तेच मी करणार . तीने ही साथ दिली . वानटाकळी येथे एका १४ वर्षाच्या मुलीचा बालविवाह सर्व कुटुंबीयांचे समुपदेशन करुन थांबवला. त्यानंतर पत्नी संगीताने पुणे येथे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून सोबतच काम करण्याचा निर्णय घेतला.
मुलांचा शोध तसेच लोकसंपर्क वाढवण्यासाठी महाराष्ट्रात ५ हजार किलोमीटर शिवराय ते भिमराय ही संकल्पना घेऊन सायकल यात्रा काढली. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी फिरत असताना २२ जिल्ह्यात ही याञा गेली. कोरोनामुळे बुलढाणा जिल्ह्यात ती थांबवावी लागली.
परळी तालुक्यातील वानटाकळी येथे २२ निराधार मुलांना स्वावलंबी बनवत शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. तो नंतर बंद पडला . तिथून अंबाजोगाई येथे सहा महिने उपक्रम राबवला. माणूस प्रतिष्ठान ची स्थापना केली आणि माझं घर हा उपक्रम २०१९ ला लातूर तालुक्यातील मौजे काडगाव येथे सुरू केला. नंतर वांगजेवाडी बुधोडा येथे ११ वर्षासाठी जागा भाड्याने घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. सध्या या ठिकाणी ५५ विद्यार्थी शिक्षका सोबतच विविध कौशल्य शिकत आहेत. त्यामध्ये १७ मुली आणि ३८ मुलांचा समावेश आहे. ११० मुले होती परंतु अनेक वेळा प्रकल्प स्थलांतर झाल्यामुळे बरेचजण निघून गेले. याची मनोमन शरदला खंत वाटते.
आगामी २ वर्षात येथे १०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या ३० टक्के हा प्रकल्प स्वावलंबी झालेला आहे. तो १०० टक्के स्वावलंबी करण्यासाठी चे प्रयत्न आहेत. येथील विद्यार्थी पुस्तकी शिक्षणा सोबतच शेतीतील कामे, भाजीपाला लागवड , गणेश मुर्ती तयार करणे, पणती तयार करणे, आकाश कंदिल बनवणे, होम हवन सामग्री तसेच मोठ्या प्रमाणात गोवऱ्या बनवणे, झेंडू फुले उत्पादन आणि विक्री, गांडूळ खत निर्मिती आशी विविध कौशल्ये शिकवून आतापासूनच त्यांना स्वावलंबनाचा धडा ही माझं घर या प्रकल्पातील मुलांना शिकवला जात आहेत.









