
लातूर : प्रतिनिधी
सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राच्या नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लातूर शहरातील बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकीकडे लातूरने देश आणि राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला अनेक दिग्गज कलाकार दिले, तर दुसरीकडे लातूरकरांच्या हक्काचे नाट्यगृह मात्र वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असल्याची खंत नाट्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
लातूरच्या नाट्य क्षेत्राला मोठी परंपरा आहे. जुन्या काळातील जाणते रंगकर्मी आणि नटवर्यां श्रीराम गोजमुंडे यांनी आपल्या अभिनयाने लातूरचे नाव राज्यभर पोहोचवले. त्यानंतर अनेक कलाकारांनी चित्रपट, नाट्य आणि कला क्षेत्रात आपला ठसा उमटवला. आज लातूरचे नाव रितेश देशमुख यांच्यासारख्या कलाकारांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचत असताना, शहरातील कलावंतांना मात्र स्वतःच्या हक्काच्या रंगमंचासाठी संघर्ष करावा लागत आहे.

लातूरचे नाट्यगृह केवळ एका वास्तूचा प्रश्न राहिलेला नसून, तो शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचा विषय बनला आहे. मात्र श्रेयवाद, राजकीय कुरघोड्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात हे काम अडकले असल्याचा आरोप नाट्यप्रेमी करत आहेत.
विशेष म्हणजे नाट्यगृहासाठी आवश्यक असलेला निधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वाढवून देण्यात आला.. तो उपलब्ध निधी सध्या पडून आहे, जे झाले जेथे झाले ते नाट्यगृह आजही अर्धवट अवस्थेत मी लातूरकरांच्या सेवा कधी करू याची वाट पहात आहे… चर्चा अशी आहे की नेमके काम कोण्या राजकारण्याच्या इशाऱ्यावर करायचे श्रेय कोणाला जाणार या प्रक्रियेत आज नाट्यगृह अर्धवट अवस्थेत उभे आहे… कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय, प्रशासनिक अडथळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे सध्या काम रखडल्याची भावना लातूरकरांमध्ये आहे.

“लातूरच्या कलाकारांनी राज्याला आणि देशाला ओळख मिळवून दिली, पण आज त्यांनाच सादरीकरणासाठी योग्य सुविधा मिळत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी भावना नाट्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
काही जणांच्या मते, नाट्यगृहाच्या कामात अडथळे निर्माण करणारे घटक कोण आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. “विकासकामांमध्ये जर कोणाचे स्वार्थ आड येत असतील तर ते थांबवले पाहिजेत. लातूरच्या कलावंतांच्या भावनांशी खेळ होऊ नये,” अशी मागणी होत आहे.
राजकीय नेत्यांनी परस्पर श्रेय घेण्याच्या स्पर्धेपेक्षा लातूरच्या सांस्कृतिक विकासाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाट्यगृह पूर्ण होणे म्हणजे केवळ इमारत उभी राहणे नाही, तर लातूरच्या हजारो कलाकारांच्या स्वप्नांना व्यासपीठ मिळणे आहे.
“आता लातूरच्या नाट्यकर्मींचा संयम संपत चालला आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या कलात्मक वाटचालीसाठी हे नाट्यगृह तातडीने पूर्ण झाले पाहिजे,” असा सूर कलाप्रेमींमधून उमटत आहे.
लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जनतेच्या हितासाठी यात लक्ष घालावे अशी मागणी लातूरकर कलावंत करीत आहेत…
लातूरच्या सांस्कृतिक वैभवाला न्याय मिळणार का, की नाट्यगृह पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकणार, याकडे संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

