
प्रतिनिधी | लातूर
राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी, उद्योजकांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि देश-विदेशातील खरेदीदार व विक्रेते यांच्यात थेट संवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे एमएसएसआयडीसी, EEPC INDIA आणि जागतिक बँक समूहाच्या सहकार्याने ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. १६ आणि १७ जून असे दोन दिवस चाललेल्या या महत्त्वपूर्ण उद्योग महोत्सवात राज्यातील विविध उद्योजकांनी सहभाग नोंदविला.
उद्योग, व्यापार आणि जागतिक बाजारपेठेच्या संधींच्या या व्यासपीठावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात लातूरच्या ए.पी. डान्स ग्रुपने सादर केलेल्या मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. लातूरच्या कला क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या समूहाने आपल्या दमदार नृत्याविष्कारातून मराठी संस्कृतीची झलक सादर केली.

अपर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या कार्यक्रमात परंपरा, ऊर्जा आणि आधुनिक नृत्यशैली यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कलावंतांच्या चमूमध्ये निखिल, शंभवी, कृष्णा, प्रतीक, मंगेश, श्रेया, प्रणाली आणि साक्षी या कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. त्यांच्या तालबद्ध हालचाली, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि मराठी संस्कृतीचा अभिमान जपणाऱ्या कलाकृतींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास पानसरे (आयएएस), श्रावणी महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी कौतुक केले. उद्योगांच्या व्यासपीठावर लातूरच्या कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मराठवाड्याची सांस्कृतिक ताकद अधोरेखित केली.
औद्योगिक प्रगतीसाठी प्रसिद्ध होत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या भूमीत लातूरच्या कलाकारांनी आपल्या कलेची मोहोर उमटवली. उद्योजकांच्या जागतिक संधींच्या या महोत्सवात कला आणि उद्योग यांचा सुंदर संगम घडवून आणण्याचे काम ए.पी. डान्स ग्रुपने केले.

लातूरच्या मातीतील या कलाकारांनी केवळ नृत्य सादर केले नाही, तर आपल्या कलेतून मराठवाड्याची संस्कृती, परंपरा आणि कलात्मक समृद्धी जगासमोर मांडली. या यशाबद्दल ए.पी. डान्स ग्रुपच्या सर्व कलाकारांचे आणि मार्गदर्शकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

