
महिलांनी सर्व क्षेत्रात उंच भरारी घ्यावी…. ज्येष्ठ समाजसेविका तथा माजी नगरसेविका श्वेताताई लोंढे यांचे प्रतिपादन. जागतिक महिला दिनानिमित्त रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, रयत महिला मंच अध्यक्षा अर्चना डोपे, रयत प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका वैशालीताई यादव, रयत प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा रेणुका लोखंडे उपस्थित होत्या. प्रास्ताविक रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे यांनी केले. त्यांनी याप्रसंगी मागील आकरा वर्षाचा रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या समाज उपयोगी उपक्रमाची माहिती दिली. रयत प्रतिष्ठान च्या माध्यमातून वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, रक्तदान शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा कार्यक्रमांमध्ये यश संपादन केले आहे. मागील आकरा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये सर्वांचे योगदान लाभले त्याबद्दल विविध पुरस्काराने रयत प्रतिष्ठानचा गौरव झाला असे याप्रसंगी सांगितले. या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा स्मृतिचिन्ह, शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये हरंगुळ खुर्द प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजकन्याताई गंभीरे ( शिक्षण ), उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या बी.एम. शीलाताई सरवदे ( महिला सक्षमीकरण ), हरंगुळ बुद्रुक च्या कृषी उद्योजक गंगाताई पनाळे ( उद्योग ), प्रभाग क्रमांक 15 च्या माजी नगरसेविका तथा समाजसेविका श्वेताताई लोंढे ( समाजसेवा ) व महानंदा मल्टीस्टेटच्या बँक अधिकारी रेणुका तत्तापुरे ( बँकिंग ) या महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वैशालीताई यादव यांनी तरुणांनी सामाजिक उपक्रमात नेहमीच सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. त्यात महिलांचा सन्मान राखून महिलांना सक्षम बनविण्यासाठी पुरुषांनीही मदत केली पाहिजे. चूल आणि मूल त्या व्यतिरिक्त ही मोठं विश्व निर्माण करण्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे, त्यामुळे महिलांनी नेहमीच पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन केले. राजकन्या गंभीरे मॅडम यांनी आपल्या मुलांना सुसंस्कारक्षम बनविले पाहिजे, इतर महिलांचा सन्मान राखा आणि व्यवसाय-शिक्षण- शेती- सामाजिक या क्षेत्रामध्ये भरभरून कार्य करा यश नक्कीच मिळेल, समाज काय म्हणेल याची कसल्याही प्रकारची चिंता न करता आपण स्वयंस्फूर्तिने, प्रामाणिकपणाने काम केल्यावर यश मिळतेच असे याप्रसंगी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रयत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री. सुनिलकुमार डोपे यांनी केले तर आभार मार्गदर्शक सुर्यकांत लोखंडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रयत महिला मंचच्या उपाध्यक्षा रेणुका लोखंडे, रयत प्रतिष्ठानचे सचिव नेताजी रणखांब, रयत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिन फत्तेपुरे, गार्गी डोपे, शिवाजी पाटील, कमलाकर सुर्यवंशी, प्रभाकर जाधव, मंचक रंडाळे, मिलिंद सोनवणे, नवनाथ भोसले, विश्वजित सांगवे, राहुल साकोळे,ओमकार सोमवंशी, शूभम आवड, अजित फुलारी, अंकुशराव डोपे, गोपाळ शिंदे यांनी प्रयत्न केले.

