
लातूर जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्या सशक्तीकरणासाठी गेले दोन वर्षे अथक लढा देणाऱ्या माझं लातूर परिवाराने अखेर ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरणासाठीची निधी मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने केलेल्या संघर्षाला यश मिळाले असून, १० मार्च २०२५ रोजी अर्थसंकल्पात ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये कृषी विभागास वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय म्हणजे लोकशक्तीच्या एका अभूतपूर्व आंदोलनाचा सुवर्णक्षण आहे.






संघर्षाची अखंड गाथा
जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी माझं लातूर परिवाराने २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. या लढ्याला लातूरमधील ५६ सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे नेते, तसेच जनतेचा मोठा पाठिंबा लाभला. प्रत्येक टप्प्यावर शासनदरबारी पाठपुरावा करताना हा लढा अधिक प्रभावी होत गेला.
विशेषतः १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना भेटून जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यानंतरही वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करत, वेळोवेळी निवेदने देत, लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटत हा लढा अधिक व्यापक करण्यात आला.
समाजासाठी लोकशक्तीचा विजय
या संघर्षाचा गड सर करण्यासाठी २८ आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी सरकार आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी शहरात मुखवटे घालून भीक मागण्याचा अनोखा निषेध करण्यात आला. हा प्रयत्न जनतेच्या भावनेचा स्फोट होता. अखेर, सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ३० जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अर्थसंकल्पात जिल्हा रुग्णालय हस्तांतरणासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले आणि १० मार्च २०२५ रोजी त्याला अधिकृत मंजुरी मिळाली.
“माझं लातूर” परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!
हा यशस्वी लढा केवळ एका रुग्णालयासाठी नव्हता, तर तो आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी होता. लातूर जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्य हक्कांसाठी सुरू झालेल्या या ऐतिहासिक आंदोलनाला यश मिळवून देणाऱ्या माझं लातूर परिवारातील प्रत्येक सदस्यांचे, तसेच या लढ्यात सहभागी असलेल्या मान्यवरांचे, सामाजिक संघटनांचे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
हा विजय म्हणजे लोकशक्तीच्या संघर्षाचा, समाजातील एकतेच्या बळाचा आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या यशाचा सर्वोच्च आदर्श आहे. लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीने येथील आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा होईल आणि सामान्य नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील.
“माझं लातूर” परिवाराला या ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा!
जय हिंद! जय लातूर!

