
बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने बँक चालवू पाहतआहे.संघटनासोबत केलेल्या करारांचे पालन बँकेकडून केले जात नाही. संघटनांचे ताब्यात घेतलेले ऑफिसेस सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनाकडून संघटनांना परत दिले जात नाहीयेत. त्यामुळे एकूणच या मनमानी, दादागिरी व हुकूमशाही कारभाराविरोधात संघटनांनी आजचा संप पुकारल्याचे सेक्रेटरी कॉ. दीपक माने यांनी सांगितले. आजचा संप ही व्यवस्थापनाच्या दादागिरी, मनमानी विरोधात व नोकर भरतीच्या प्रमुख मागण्यासाठी होऊ घातलेल्या संघर्षाची सुरुवात असल्याचे व येथून हा लढा आणखी तीव्र बनत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तम ग्राहक सेवेसाठी नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी करीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र मधील या संपास ग्राहकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष कॉ.उत्तम होळीकर यांनी केले.
यावेळी बँकेच्या मिनी मार्केट येथील लातूर मुख्य शाखे समोर जमून जिल्हाभरातील 50 ते 60 कर्मचाऱ्यांनी हातात मागणी फलक घेऊन व मुजोर व्यवस्थापनाचे विरोधात घोषणा देऊन दणदणीत संप साजरा केला. यावेळी कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. महेश घोडके, कॉ. उदय मोरे, कॉ. प्रकाश जोशी, कॉ. बालाजी मुळजे, महिला कर्मचारी नेत्या कॉ. रेश्मा भवरे, कॉ. संजीवनी गोजमगुंडे, कॉ.ऐश्वर्या उदावंत यासह जिल्हाभरातून सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आज बँकेच्या जिल्यातील सर्व 15 शाखांचे कामकाज ठप्प होते.

यावेळी इतर बँकेतील कर्मचारी संघटनांनी प्रत्यक्ष येऊन या संपास पाठिंबा व्यक्त केला.

