
लातूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांचा वाढदिवस यंदा लातुरात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कुठलाही जल्लोष, हारतुरे किंवा राजकीय भाषणे न करता, उन्हात राबणाऱ्या मजुरांना आधार देणाऱ्या सामाजिक उपक्रमाने वाढदिवसाला समाजभानाची प्रेरणादायी दिशा दिली.

लातूरमधील प्यारे खान युवा फाउंडेशनचे अध्यक्ष व पत्रकार सालार शेख यांच्या पुढाकाराने, वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवसभर रोजगाराच्या शोधात थांबणाऱ्या ५०० मजुरांना टोपी व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. “सामाजिक कार्य हेच खरे वाढदिवसाचे औचित्य,” ही भूमिका या उपक्रमामागे ठळकपणे दिसून आली.
सामाजिक जाणिवा आणि कृती यांचे उत्कृष्ट उदाहरण
या उपक्रमात होम डीवायएसपी गजानन भातलवंडे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोईजभाई शेख, आणि सामाजिक कार्यकर्ते सर्फराज बाबा मणियार, यांच्यासह लातूरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. लालासाहेब शेख, बरकत काझी, फैसलखान कायमखानी, तसेच पत्रकार हारून मोमीन आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
उन्हाच्या झळा अंगावर झेलत काम करणाऱ्या कामगारांना उन्हापासून थोडा दिलासा मिळावा, ही पत्रकार सालार शेख यांची संकल्पना प्रशंसनीय ठरली. या उपक्रमामुळे केवळ गरजूंना मदतच झाली नाही, तर “समाजासाठी काहीतरी करावं” अशी प्रेरणा लातूरच्या अनेक युवकांना मिळाली आहे.
प्यारे खान यांची लोकाभिमुखता अधोरेखित
प्यारे खान हे केवळ अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष नसून, त्यांच्या कार्यपद्धतीतून जनतेशी असलेली आत्मीयता सतत झळकते. त्यांचा वाढदिवसही कोणताही राजकीय रंग न देता समाजोपयोगी कार्याला वाहून दिला जाणे, हे त्यांच्या कार्यसंस्कृतीचं प्रतिक आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान
या उपक्रमाचे विशेषत्व म्हणजे त्यात कोणताही राजकीय दिखावा नव्हता. केवळ गरज ओळखून, कृतीतून समाजाचे ऋण फेडण्याची ही एक नम्र वाटचाल होती. पत्रकार सालार शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेला हा सामाजिक भानाचा आदर्श अनेक नव्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, हे नक्की.

