
युद्धं केवळ रणांगणावर जिंकली जात नाहीत. खरी लढाई असते ती विचारांची, मूल्यांची, आणि संस्कृतीची. हेच आजच्या जागतिक संघर्षांमधून अधोरेखित होतं. भारत आणि पाकिस्तान – एकाच मध्यरात्री जन्मलेले दोन देश. पण एक देश प्रगतीच्या पहाटेकडे वाटचाल करतोय, तर दुसरा अजूनही धर्मांधतेच्या मध्यरात्री अडकून बसलाय.
पहेलगाम येथील अतिरेकी हल्ला हे त्याच धर्मांध विचारसरणीचे दुसरे प्रकट रूप. श्रद्धाळू अमरनाथ यात्रेकरूंवर करण्यात आलेला हा भ्याड हल्ला केवळ व्यक्तींवर नाही, तर भारतीयत्वावर होता. पण हे विसरून चालणार नाही की भारताला अशा हल्ल्यांनी रोखता येणार नाही. उलट, प्रत्येक अशा घटनेनंतर भारत अधिक बळकट होतो, अधिक एकजूट होतो.
पाकिस्तानला वारंवार अराजकता, यादवी आणि आतंकवादाचा तडाखा का सहन करावा लागतो? लोकशाही का रुजत नाही? तुकडे का पडतात आणि आणखी तुकडे पडण्याची भीती का वाटते?
या साऱ्याचे मूळ कारण एकच – धर्माच्या अधिष्ठानावर राष्ट्र उभारण्याचा अयशस्वी प्रयत्न. धर्म ही एक व्यक्तिगत श्रद्धा असते; राष्ट्रनिर्मितीचा पाया मात्र समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवरच घातला जाऊ शकतो. भारताने हे जाणले आणि संविधानाच्या मार्गदर्शनाखाली धर्मनिरपेक्ष, बहुविध समाजरचनेची कास धरली.
त्यामुळेच आज भारतात व्योमिका सिंह आणि सोफिया कुरेशी या दोन स्त्रिया – एक हिंदू आणि एक मुस्लिम – आपली सैन्यशक्ती आणि वैचारिक सामर्थ्य देशासमोर उभं करतात. विंग कमांडर व्योमिका सिंह आकाशात आपल्या शत्रूच्या छावण्या उध्वस्त करताना दिसते, तर कर्नल सोफिया कुरेशी शांत, ठाम आवाजात प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या लष्कराची समजूतदार कारवाई मांडताना दिसते.
हीच खरी पाकिस्तानची हार आहे – कारण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या, सामर्थ्याच्या मुळाशी धर्म नव्हे, तर संविधान आणि त्यावर आधारलेली लोकशाही आहे. आपल्याकडे धर्म एकत्र आणतो; तिथे तो फोडतो. आपल्याकडे विविधता ही ताकद आहे, तिथे ती संकट.
भारतीय लष्कराची अलीकडील कारवाई म्हणजे केवळ सामरिक विजय नाही, तर तो विचारांच्या लढाईत मिळवलेला विजय आहे. जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्मातील महिला सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, तेव्हा पाकिस्तानातील बुरसटलेल्या, स्त्रीविरोधी मानसिकतेवर खरा सर्जिकल स्ट्राईक होतो.
भारतीयत्व ही एक भावना आहे – जी जात, धर्म, लिंग, भाषा यापेक्षा मोठी आहे. भारताच्या संविधानाने ती भावना प्रत्येक नागरिकाला दिली आहे – उंच आकाशात झेप घेण्याची आणि भक्कम जमिनीवर पाय रोवून उभं राहण्याची.
फायटर विमाने, क्षेपणास्त्रे ही राष्ट्राच्या संरक्षणासाठी आवश्यक आहेतच. पण या शस्त्रास्त्रांच्या मागे उभं असणारं विशाल, उदात्त, समंजस हृदय – हेच आपल्या राष्ट्राचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे, जपलं पाहिजे, आणि पुढील पिढ्यांना आत्मसात करून दिलं पाहिजे.
पहेलगामच्या हल्ल्याला भारताने केवळ प्रत्युत्तर दिलं नाही, तर ज्या मुल्यांवर देश उभा आहे ती मूल्यं अधिक ठामपणे जगासमोर मांडली. हीच खरी विजयी घोषणा आहे. आणि पाकिस्तानचा खरा पराभव सुद्धा.
– [दिपरत्न निलंगेकर]

