
अभय मिरजकर.लातूर
(9923001824)
सायंकाळची वेळ झालेली होती, पाणवठ्यावर एकदम शांतता होती. चार चाकी वाहनाच्या इंजीनाचा आवाज फक्त ऐकण्यास येत होता. पाणवठ्यावर थोडावेळ लक्ष केंद्रित केले पण काही हालचाल दिसली नाही . दूर अंतरावर गवतात हालचाल दिसली. अधिक निरखून पाहिल्यानंतर वाघाचा थोडासा वरचा भाग दिसला. समोरून येणाऱ्या मोरांसाठी दबा धरून बसला असल्याचे लक्षात येते होते. मोर टप्प्यात आले नव्हते ते परत मागे सरकले आणि सावज टप्प्यात येण्याच्या प्रतिक्षेत वाघ जमिनीवर आडवा झाला. आणि अचानक दुसरा वाघ एकदम समोर आला. त्याचा चेहरा पुढे येताच सर्वांचे आवाज खोल गेले. अतिशय रुबाबात तो समोर आला. दुरुनच तो वाघ नाही तर वाघिण असल्याचे कळले. तीने आम्हाला पाहिले, आम्ही तिला पाहिले, नजरानजर झाली पण तिच्या नजरेत ना कसली भीती होती ना चिंता. पाहणाऱ्यांच्या नजरेत माञ अनेक भाव तरळत होते. सर्व जण स्तब्ध झालेले होते, आवाज हळू कधी झाला ते समजले नाही. श्वासाची गती पण मंदावली आणि हृदयाची धडधड पण वाढलेली होती. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे याची प्रचिती सर्वांना येत होती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील महाराणी ने आम्हाला दुर्लभ असे दर्शन दिले होते.

चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (चंद्रमा) यांच्यावतीने दिनांक 14 जुलै ते 16 जुलै या कालावधीमध्ये पत्रकारांसाठी वन्यजीव व जैवविविधता संवर्धन या विषयावरील कार्यशाळा घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी क्षेत्र भेटीचे नियोजन होते पण थेट ताडोबा मध्ये घेऊन जाणार याची कोणालाच कल्पना नव्हती. दुपारी दोन वाजता चंद्रपूर येथील वन अकादमीच्या वाहनांमधून आम्ही सर्व जण ताडोबाच्या दिशेने निघालो होतो. रस्त्यामध्ये वानरांचे दर्शन झाले होते. रंग बदलणारे भुत्या झाडाचे दर्शन झाले व त्याची थोडक्यात असलेली माहिती पण मिळाली.
वन विभागाच्या वाहनातून पुढचा प्रवास सुरु झाला. सोबत एक गार्ड, एक गाईड आणि नवीन वाहन चालक. काचेच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून दिलेले होते. प्लास्टिक कचरा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. सर्वांचे भ्रमणध्वनी पण काढून डब्यात ठेवलेले होते. जंगलातील डांबरीरोडवरुन वाहन जात होते. अचानक बाजूच्या झाडीत सळसळले, वाहनाचा वेग कमी झाला आणि भली मोठी अस्वलीने पिलासह आम्हाला दर्शन दिले. वाहनाच्या आवाजाने ती अधिक दक्ष झाली होती, थेट मागच्या दोन पायांवर उभे राहून तीने आवाज केला, आपल्या पिलाला जवळ बोलावून घेतले आणि दोघेही झाडांमध्ये अदृश्य झाले. हि आठवण स्मरत असताना वाहनानेही गती पकडलेली होती.


थोड्या अंतरावर वाहनाची गती मंदावली, समोरच्या बाजुला सांबर दिसून आले. त्यांना पाहात पाहत छायाचित्रे घेत वाहन पुढे निघाले. डांबरी रोड सोडून वाहन कच्च्या रस्त्यावर पुढे जात होते. पुन्हा वाहनाचा वेग मंदावला. समोर भले मोठे दोन गवे रस्त्यावर दिसुन आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडीमध्ये दोन्ही बाजूकडे गव्यांचा मोठा कळप असल्याचे निदर्शनासाठी. वाहनाच्या गाईडने आम्हाला गव्याची सविस्तर माहिती दिली. भारतीय गवा आणि परदेशी गव्यातील फरक सांगीतला. भारतीय गव्यांच्या चारही पायांना जणू पांढरे मोजे घातलेले असल्याचे दिसते. थोडावेळ त्यांचे सर्वांचे निरीक्षण करत हळूहळू वाहन पुढे सरकू लागले.
मध्येच हरिणांचा कळप, रान कोंबडी, तळ्यात असणाऱ्या मगरीचे केवळ डोके पाहात आम्ही पुढे सरसावलो. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका गावाचे संपूर्ण पुनर्वसन झालेले त्या गावातील पाणवठ्यावर वाहन थांबलेले. थोडावेळ थांबून निरीक्षण करत पुढे निघालो. वाघाचे दर्शन होणार की नाही याची धाकधूक लागलेली. थोडे पुढे गेल्यानंतर वाघाच्या पावलांचे ठसे दिसुन आले. त्या ठस्यांचा माग काढत वाहन पुढे जात होते. पण पुढे काही अंतर गेल्यावर ठसे दिसेनासे झाले. एका दुसऱ्या पाणवठ्यावर गाडी थांबली आणि झाडीत आवाज आला. सर्व जण आवाजाच्या दिशेने बघू लागले. रानडुक्कराने मला फोटोसाठी जणू पोज दिली आणि फोटो काढल्यानंतर धूम ठोकली. तेथे मोठ्या प्रमाणात फुलपाखरे वेगवेगळ्या प्रकारची पाहता आली.

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे याची प्रचिती

वाघाचे दर्शन झाले नव्हते, परतीचा मार्ग सुरू झाला. आमच्या वाहन चालकाने पुन्हा एकदा फिरुन तोच पाणवठा गाठला. पाणवठ्यावर वाहन थांबलेले होते. सर्वांच्या नजरा बाहेर सर्व बाजूला वाघाला शोधत होत्या. पाणवठ्यावर शांतता होती, पाण्यात मगर असल्याचे दिसून आले. अचानक दुरवर गवतात हालचाल झाली. दूर अंतरावर वाघ सावजाचा अंदाज घेत, सावज टप्प्यात येण्याची वाट पाहत असल्याचे दिसून आले. अनेकांना ते दिसत पण नव्हते. परंतु कॅमेऱ्याच्या लेन्समुळे तो स्पष्टपणे दिसला. सर्वांना कॅमेरा पाहण्यासाठी हवाहवासा वाटू लागला. काही जणांची हौस फिटली.
वाघाच्या समोर दोन मोर जवळ जात होते, त्यामुळे वाघाने हालचाल थांबवली आणि आपण दिसणार नाही असे गवतात अंग लपवले. दरम्यान दोन्ही मोर पुढे येण्याचे थांबले व परत फिरले पण मागेही अधिक गेले नाहीत. त्यामुळे वाघही सावज टप्प्यात येण्याची वाट पहात होता. अचानक दुसऱ्या वाघाचा चेहरा गवतामधून पुढे आला. अगदीच ऐटीत, संथ आणि सावधगतीने तो पुढे आला. त्याला समोर पाहताच सर्व जण स्तब्ध झाले. आवाज आपोआप मंदावला. हृदयाची धडधड वाढली, श्वासांची गती पण मंदावली गेली. चेहरा समोर येताच अगदीच तयारीत असल्यामुळे पटापट फोटो घेण्यास सुरुवात केली.
ताडोबातील तो वाघ नव्हता तर वाघिण होती. दोघी बहिणी सोबतच असतात असे गाईडने सांगितले. एकदम रुबाबात ती चालत पुढे आली, आम्ही तिला पाहात होतो, तीने ही आम्हाला पाहिले. पण तिच्या नजरेत भीतीचा लवलेश ही नव्हता. जणू काही आमचा तिच्यावर काडीचाही परिणाम होणार नाही असे भासवत मंद मंद पावलांनी ती चालत येत आहे. तिच्या चालण्यात ही एक रुबाब होता. पाणवठ्याच्या कडेने हळूहळू ती आमच्याकडे सरकत होती. अचानक पाण्यात ती बसली, एक मासा फस्त करत जोरात जांभळ्या देत इकडे तिकडे पाहात होती. पाण्यात बसलेली छायाचित्रे घेतली, कॅमेरॅकडे पहात जणू काही हिंदी चित्रपटातील गीता प्रमाणे ( तू खिच मेरी फोटो..) " काढ माझा फोटो " असे सांगत एक छान पोज दिली.
हळूच पाण्यातून उठून ती गाडीच्या दिशेने निघाली, वाहनात चुळबुळ सुरु झाली, आपल्या कडेच येतेय, मागे गाडी घ्या असे दबक्या आवाजात म्हणू लागले. पण तीने पाणवठ्याच्या कडेने पुन्हा पुढे मोर्चा वळवला. गाडीच्या पुढच्या दिशेकडे ती गेली. या सर्व प्रवासात ती आपले ठिक ठिकाणी मार्किंग करत होती. तो सर्व प्रवास अगदी बारीक सारीक तपशीलवार पाहता आला, अनुभवता आला.
दरम्यानच्या सर्वात प्रथम पाहिलेली वाघिण आणखीन ही सावजाची वाट पाहात स्थीर होती. त्यामुळे तिकडे न पाहता आम्ही गाडीच्या पुढच्या भागाकडे चालत निघालेल्या वाघिणीच्या पाठीमागून जाऊ लागलो. दोन तीन वेळा ती थांबली, वाहनाकडे, आतील लोकांकडे पाहिले आणि पुन्हा सर्वांना तुच्छ समजत आपली संथ चाल पुढे सुरू ठेवली. अचानक चालण्याचा वेग थांबला, समोरच्या झाडीच्या पलीकडचा कानोसा घेतला आणि संथपणे जणू दबक्या पावलांनी ती झाडाच्या आडोशाच्या बाजूने पुढे सरकली. झाडाच्या पुढच्या बाजूला काळवीट आणि हरणांचा मोठा कळप होता . सावज टप्प्यात येण्याच्या तयारीत ती झाडाच्या आडोशाला दबा धरून बसली. बराच वेळ थांबून निरीक्षण केले पण ती पुढे काही सरकत नव्हती. हरणाची शिकार करताना पाहायला मिळेल म्हणून सर्व जण एकटक डोळे लावून पाहात बसलेले पण तिची हालचाल स्तब्ध होती. शेवटी वेळेचे भान राखत तीचा प्रवास डोळ्यात साठवून ठेवत वाहन परत फिरले. परतीच्या वेळी चार ठिकाणी हरणांचे कळप दिसले. एका काळविटाने फोटो साठी सुंदर पोज दिली. थोड्या अंतरावर अचानक वाहनांची गती मंदावली. समोर एक अप्रतिम नृत्य सुरु होते. पुर्ण पिसारा फुलवलेला मोर जणू आमच्या निरोपासाठी सुंदर नृत्य सादर करत होता. त्याची खुपशी छायाचित्रे पण काढली. वाघिण पाहिल्याचा , तीची खुप सारी छायाचित्रे घेता आली हा निखळ आनंद घेत वन विभागाच्या वस्तीगृहात राञी परतलो. .....


अभय मिरजकर, पञकार. लातूर.(९९२३००१८२४)
abhaysaamana@gmail.com.

