झेंडे, पताकांना स्टीलरॉड वापरणे टाळा – महावितरणचे आवाहन
लातूर, दि.४ सप्टेंबर: गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मिरवणुकीदरम्यान वीजवाहिन्या, विद्युत खांब तसेच ट्रान्सफॉर्मर आदी वीज यंत्रणेजवळून जाताना विशेष दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
महावितरणने सांगितले की, मिरवणुकीदरम्यान उंचावलेले रथ, सजावट केलेले मंडप, झेंडे वा पताका यांचा संपर्क वीजवाहिन्यांशी आल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मंडळांनी मिरवणुकीच्या मार्गा दरम्यान वीजवाहिन्या आणि विद्युत उपकरणांपासून आवश्यक तेवढे अंतर ठेवणे गरजेचे आहे.
नागरिकांनी तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खालील बाबींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे:
· मिरवणुकीत उंच फलक, झेंडे, रथ वा सजावट अशा उपकरणांचा वापर करताना विद्युत वाहिन्यांपासून अंतर ठेवावे.
· झेंडे, पताका यांना शक्यतो स्टीलचे रॉड वापरले जातात, स्टील हे वीजवाहक असल्याने प्रसंगी प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे स्टील रॉडच्या ऐवजी लाकडी अथवा पीव्हीसी पाईप वापरावेत.
· ट्रान्सफॉर्मरजवळ, ओपन वीज तारा वा विद्युत यंत्रणेवर फटाके फोडू नयेत.
· कुठेही तारा तुटलेले किंवा पडलेले दिसल्यास लगेच महावितरणच्या आपत्कालीन २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.
आपला थोडासा जागरूकपणा अनेकांचे प्राण वाचवू शकतो. विद्युत अपघात टाळून सुरक्षित व आनंदी वातावरणात उत्सव पार पाडणे हेच सर्वांचे ध्येय असावे. नागरिकांनी आनंदाच्या उत्सवाबरोबरच सुरक्षिततेचाही विचार करून विसर्जन मिरवणुक सुरक्षित पार पाडावी, असे विशेष आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

