
लातूर, दि.९ (प्रतिनिधी) – प्रत्येकांनी चांगले कर्म करावे, विश्वास ठेवावे, जमेल ती सेवा करावी, जीवन क्षणिक आहे हे समजून घेऊन हसत हसत जीवन जगा, असा संदेश श्री श्री श्री रविशंकर गुरुजी यांनी लातूर येथे अनुग्रह या कार्यक्रमात बोलताना दिला.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या सत्संग सोहळ्याचे आयोजन लातूर येथे आज करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात त्यांच्या अनुयायांना अनुग्रह देताना त्यांनी जीवन जगण्याचे चार मंत्र दिले. कसे आहात असे मराठीतून विचारत त्यांनी सांगितले की, आज लातूर येथे भक्तीची लाट उसळली आहे. कालाय तस्मै नमः हे लक्षात घ्या. तुमची वेळ चांगली असेल तर शत्रूही मित्राप्रमाणे वागतो. पण वेळ वाईट असेल तर सर्वच वेगळे वागतात. काळ बदलत असतो. सर्वांना कष्ट सहन करावे लागतातच. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, भगवान श्रीकृष्ण, राम यांनाही कष्ट सहन करावे लागले आहेत.

चांगले कर्म करा, विश्वास ठेवा, विश्वास ठेवला तर ऊर्जा मिळते. प्राणायाम, योग, ध्यान करा त्यामुळे आपली ऊर्जा वाढते. र्हदयात करुणा, प्रेम असले पाहिजे. ज्याच्या र्हदयात प्रेम, करुणा नाही तो कोणत्याच कामाचा नाही. तणावमुक्त रहा, सध्या सर्वांमध्ये एवढा तणाव वाढला आहे की प्रेम, करुणा व्यक्त करता येत नाही. जीवनाला विशाल दृष्टिकोनातून पहावे. साधना करावी, तणावमुक्त जीवन जगा. संवेदनशील रहा, सेवा करा. जेवढी सेवा करणे शक्य आहे तेवढी सेवा करावी. हे जीवन क्षणिक आहे हे लक्षात ठेवा. हे शरीर नश्वर आहे, हे समजले तर चिंता मिटेल आणि हसत हसत जीवन जगा. तुमच्या सर्व समस्या, कष्ट मला द्या आणि जीवन आनंदाने जगा, असेही श्री श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.


