
अभय मिरजकर, लातूर
शासनाच्यावतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. त्याचा योग्य उपयोग करुन घेतला तर निश्चीतपणे प्रगती साधता येते. अहमदपूर तालूक्यातील मौजे उमरगा (यल्लादेवी) येथील शुभांगी अंगद पांचाळ यांचा प्रवास पाहिला तर त्याची साक्ष पटते.

केवळ १२ वी पर्यत शिक्षण घेतलेल्या शुभांगी अंगद पांचाळ या बचत गटाशी जोडल्या गेल्या. संत ज्ञानेश्वरी स्वयं सहाय्यता समुहाच्या माध्यमातून त्यांनी प्रगती साधण्याचा प्रयत्न केला.कुटूंबाची साथ, योग्य मार्गदर्शन यामुळे त्यांनी उद्योगात भरारी घेतली.उमेद अभियानात सहभागी होत त्यांनी प्रशिक्षण घेतले. महिलांचा व्यवसाय म्हणजे शिलाई मशिन हे समिकरण ठरलेले. त्याचप्रमाणे शुभांगी पांचाळ यांनीही १ लाख रुपयांचे कर्ज घेऊन शिलाई मशिनच्या सहाय्याने व्यवसाय सुरु केला. ग्रामिण भागातील महिलांना प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी केले. शिलाई मशिनच्या माध्यमातून ब्लाऊज शिवणे, पिको फॉल करणे अशी कामे त्यांनी सुरु केली. त्यानंतर पिठाची गिरणी, दाळ मिल असा व्यवसायही सोबत सुरु केला. त्यांचे पती अंगद पांचाळ हे पारंपारिक सुतारकाम करीत असत. त्या जोडीला शिलाई मशिन, पिठाची गिरणी, दाळ मिल असे उद्योग सुरु झाले.

बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीच्या स्टॉलमुळे त्यांना लाकडी खेळणी करण्याची कल्पना सुचली.महाराष्ट्रात सावंतवाडी हे लाकडी खेळणी तयार करण्यासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे शुभांगी पांचाळ यांनी आपल्या पतीसोबत थेट सावंतवाडी गाठले. तिथे तयार होणार्या वस्तूंची माहिती घेतली. आपण काय करु शकतो याची दोघांनाही कल्पना आली आणि लाकडी खेळणी तयार करण्याच्या उद्योगाची सुरुवात करण्याचे ठरले. ६० हजार रुपयांचे कर्ज घेऊन छोटया प्रमाणात लाकडी खेळणी तयार केली. त्यामध्ये लाकडी बैलगाडी, मोबाईल स्टॅन्ड, आकाश पाळणा, छोटा पाळणा, लाकडी जाते, नांगर, बाज,पोळी पाट असे साहित्य तयार केले. लातूर येथे भरलेल्या हिरकणी हट मध्ये त्यांनी या वस्तूंची विक्री केली. तब्बल ४८३८० रुपयांच्या मालाची विक्री झाली आणि हाच पारंपारिक व्यवसाय पुढे अधिक प्रमाणात करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. यासाठी कांही अत्याधुनिक मशिन्स लागणार होत्या, त्यासाठी त्यांनी बँकेशी संपर्क साधला आणि बँकेकडून ३ लाख रुपये आणि वैयक्तीक गटाकडून ८० हजाराचे कर्ज घेतले. संत ज्ञानेश्वरी लाकडी खेळणी व्यवसायाची जोरदार सुरुवात झाली. जी महिला कधी गावाच्या बाहेर सुध्दा पडलेली नव्हती ती एक चांगली उद्योजक म्हणून गावातच नव्हे तर तालूक्यात आणि जिल्ह्यात ओळख निर्माण झाली.

मागील वर्षी मुंबई येथे प्रदर्शनासाठी निवड झाली. मुंबईतील सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीते आत्मविश्वासाने आपले साहित्य विक्री केले.तिथे खुप सार्या गोष्टी शिकायला मिळाल्या.मनात आत्मविश्वास निर्माण झाला.अनेक नामवंत व्यक्ती,सिने कलाकार,उमेद अभियानातील अधिकारी वर्ग यांच्याशी ओळख झाली.खुप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.या प्रदर्शनामध्ये तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा व्यवसाय झाला.केवळ व्यवसाय झाला असे नाही तर खुप काही शिकता आले. अहमदपूरचे आमदार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सत्कार केला. आम्ही तयार केलेली बैलगाडी नागपूर विमानतळावर ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमेदच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरी लाकडी खेळणीचे साहित्य उमेद मार्ट या ऑनलाईन पोर्टलवर पण विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. ३६ महिण्यामध्ये बँकेचे काढलेले ३ लाखाचे कर्ज प्रतिमहिना ८८६० प्रमाणे परतफेड करुन कर्जमुक्तही झाले. सध्या दरमहिना किमान १४५०० रुपयांचा व्यवसाय या पारंपारिक उद्योगातून होतो. कधी कधी अधिक पण उत्पन्न होते हे पण शुभांगी पांचाळ यांनी अभिमानाने सांगीतले. केवळ गाव, तालूका किंवा जिल्ह्यातील महिलांसमोरच नव्हे तर राज्यातील महिलांसमोर त्यांनी एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून आपला ठसा उमटवला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
अभय मिरजकर, लातूर,
