वादनाने रसिक मंत्रमुग्ध

लातूर- दि.३ लातूर येथील आवर्तन प्रतिष्ठान’च्या दशकपूर्ती निमीत्त आयोजित स्व. उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित “ताल समर्पण” संगीत सभा जगविख्यात महीला तबला वादीका विदुषी रिंपा शिवा यांच्या स्वतंत्र तबला वादनाने रंगली. गेल्या दहा वर्षापासून आवर्तन प्रतिष्ठान सातत्याने प्रत्येक महिन्याला शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित करते. गायन, वादन व नृत्यक्षेत्रातील प्रतिथयश कलावंतांनी आवर्तन चा रंगमंच आपल्या कलेच्या माध्यमातून सजवला. त्या अनुषंगाने आवर्तन प्रतिष्ठान’चे एकशे विसावे आवर्तन लातूरकर रसिकांसाठी पर्वणीच ठरले.
‘ताल समर्पण’ संगीत सभेच्या पूर्वार्धात लातूर शहर व पंचक्रोशितील जवळ-जवळ चाळीस उदयोन्मुख तबलावादकांनी आपल्या समूह तबला वादनाने उ. झाकीर हुसेन यांना आपली कला समर्पित करून रसिक, श्रोत्यांना एक अनोखी मेजवानी दिली. सर्वच तबला वादकांनी एकत्रित रित्या उठान, पेशकार, कायदा,
रेला, टुकडे, त्रिपल्ली, चक्रधार इ. वादन सामुग्रीचा एकत्रीत आविष्कार करून रसिकांमध्ये चैतन्याची लहर निर्माण केली या सर्व तबलावादकांना लातूर मधील प्रसिद्ध संवादिनी वादक व गायक चैतन्य पांचाळ यांनी लहरा साथ संगत केली.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या संगीत सभेच्या उत्तरार्धात रंगमंचावर मुर्ती लहान पण किर्ती महान ‘ या उक्तीला सार्थ ठरवणाऱ्या जगविख्यात तबला वादीका विदुषी रिंपा शिवा यांचे आगमन झाले. आपल्या वादनाची सुरुवात त्यांनी विलंबित तीनताल मध्ये पेशकार ने केली. लय-लयकारीच्या माध्यमातून पेश केलेला पेशकार त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देत होता. वडिल व गुरू पं. सपन शिवा यांच्या कडुन फरुखाबाद घराण्याची रितसर तालीम घेतलेल्या रिंपा शिवा यांनी पेशकार नंतर विविध जातीतील कायदयाचे अप्रतिम
सादरीकरण केले. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या स्वतंत्र तबला वादनाने रसिक, श्रोत्यांना भाव विभोर अवस्थेची अनुभूती क्षणोक्षणी येत होती. आपल्या वादनाचा
विस्तार करताना विदुषी रिंपा शिवा यांनी फरुखाबाद घराण्यातील अनेक
गती, टुकडे, चक्रधार वाजवण्याबरोबरच बनारस घराण्याचे महान तबलावादक
पं. अनोलाल मिश्र यांचा रेला चमत्कृती पूर्ण रितीने वाजऊन रसिकांना मंत्रमुग्ध
केले,
द्रुत तिनताल मध्ये विविध लग्गी, लडीचे तयारीने सादरीकरन त्यांनी
केले. समेवर येण्याचा विशिष्ट अंदाज, हस्तचाप ल्य, वादनातील माधुर्य, कधी कोसळणाऱ्या जलप्रपाताप्रमाणे तर कधी मृदु मुलायम अशा सर्वच वादनवैशिष्ट्याने नटलेल्या वादनाने रिंपा शिवा यांनी रसिक, श्रोत्यांची वाहवा मिळवली.
विदुषी रिंपा शिवा यांना अप्रतिम अशी लहरासंगती श्री योगेश रामदास यांनी समर्थपणे केली या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई उदगीर धाराशिव निलंगा अहमदपूर चाकूर जळकोट अशा विविध ठिकाणाहून रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरूवात उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात केली. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, तालमणी डॉ. राम बोरगावकर, अभय शहा, डॉ रविराज पोरे, उपप्राचार्य डॉ अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ प्रशांत दीक्षित, संगीत विभाग प्रमुख डॉ देवेंद्र कुलकर्णी, सुनील देशपांडे, विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. शशिकांत देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ संदीपान जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसठी प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, संजय सुवर्णकार, चैतन्य पांचाळ, दिनकर पाटील, तेजस धुमाळ, केशव जोशी, एकनाथ पांचाळ, व्यंकटेश पांचाळ, संजय आयाचित, सुनील टाक, विवेक डोंगरे, डॉक्टर भदाडे, काकासाहेब सोनटक्के, शरद होळकर, शंभूदेव केंद्रे यांनी परिश्रम घेतले

