
लातूर | प्रतिनिधी
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना घेऊन जाणारे विमान लातूर विमानतळावरच अडकले. आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय परवानग्या वेळेत न मिळाल्यामुळे विमान उड्डाण करू शकले नाही. या घटनेमुळे लातूर विमानतळाच्या अपूर्ण सुविधांचा आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लातूर येथून जळगावकडे जाण्यासाठी विमान उड्डाणासाठी बीदर तसेच अन्य संबंधित विमानतळांकडून आवश्यक क्लिअरन्स घ्यावी लागते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विमान उड्डाण शक्य नसल्याचे पायलटने स्पष्ट केले. या संदर्भात लातूर विमानतळ प्रशासनानेही क्लिअरन्स न मिळाल्याची माहिती दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, लातूर विमानतळावर नाईट लँडिंगसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सुविधेसाठी लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना आणि नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या संदर्भात प्राथमिक हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, पुढील काळात हा प्रस्ताव फाईलमध्येच अडकून पडल्याचे चित्र आहे.
आज मंत्र्यांचे विमानच उड्डाण करू न शकण्याची घटना लातूरच्या हवाई सुविधांच्या दयनीय अवस्थेचे प्रतीक ठरत आहे. वाढत्या औद्योगिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर लातूर विमानतळाच्या विकासासाठी ठोस निर्णय कधी घेतला जाणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
लातूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला अद्याप अत्याधुनिक हवाई सुविधा न मिळणे ही केवळ प्रशासकीय अपयशाचीच नव्हे, तर शासनाच्या उदासीनतेचीही ज्वलंत उदाहरणे असल्याची चर्चा सुरू आहे.
