
उत्तम दिग्दर्शक, अभिनेता, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, नेपथ्यकार अशा विविध रूपात नटराजाची सेवा करणारा अवलिया रंगकर्मी, सध्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याने त्रस्त आहे.
सततच्या डायलिसिसमुळे त्याला त्याचे आरोग्य आणि उदरनिर्वाह कठीण होत आहे, तरीही अत्यंत स्वाभिमानी असा *कल्याण* कधीही कोणाकडेही मदतीची याचना करायला गेला नाही की मूत्रपिंड प्रत्यारोपणसाठी (किडनी ट्रांसप्लंट) येणारा खर्च त्याने कोणाकडेही मागितला नाही.
आम्ही काही नाट्यकर्मी, मित्रमंडळी यांनी एकत्र येऊन, तो खर्च करतो असा मानसही कल्याणजवळ बोलून दाखवला पण ते देखील कल्याणच्या स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वामुळे शक्य झाले नाही.
*मग आम्ही सर्वांनी कल्याणला एक युक्ती सुचवली. “तुम्ही दिग्दर्शित केलेल्या नाटकाचा व्यावसायिक प्रयोग करावा”, त्याच्या तिकीट विक्रीतून येणारा सर्व पैसा ‘कल्याण निधी’ म्हणून संकलित करून त्यातून उपचारासाठी लागणारा वैद्यकीय खर्च उभा करावा. यास होकार देण्यासाठी लातूरातील बरेच नाट्यकर्मी व तंत्रज्ञ यांनी कल्याणला गळ घातली. याला त्याने कसाबसा होकार दिला आहे.*
त्याच्या स्वाभिमान आणि जिद्दीला सलाम करुन, आम्ही काही नाट्यकर्मी त्याच्या या उपचारांसाठी निधी संकलन करण्याकरिता *“सभ्य गृहस्थ हो” *२२ फेब्रुवारी शनिवार आणि “नटसम्राट”* *१ मार्च शनिवार * या दोन नाटकांचे *व्यावसायिक प्रयोग* करणार आहोत. ठिकाण :- स्व दगडूजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड लातूर वेळ :- रात्री ठीक 8 वाजता
कल्याणची मोठी बहीण, कल्याणला एक मूत्रपिंड (किडनी) दान देण्यास तयार झाली.
सुदैवाने त्याबाबतच्या चाचण्या केल्या असता ती कल्याणच्या शरीराला अनुरुप (मॅच) देखील होत आहे, ही समाधानाची बाब आहे. पण या प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च 12 लाख रु एवढा मोठा आहे.
पूर्वीपासूनच कल्याणची घरची परिस्थिती अगदीच सामान्य, त्यात लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. त्यांच्या आईने, मिळतील ती कामे करून मुलांना मोठ्या कष्टाने वाढवले.
लहानपणापासून नाटकाची आवड असणारा कल्याण, “बाल कलाकार” म्हणून त्याची रंगभूमीशी नाळ जोडली गेली ती कायमची !!
आजही, तब्येत बरी नसताना सुद्धा कल्याणचा नाट्यप्रवास निरंतर सुरूच आहे.
आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने छोट्या-मोठ्या नोकऱ्या, तर कधी व्यवसाय करुन त्यातून उदरनिर्वाह चालूच होता आणि रंगभूमीसाठी कामे करणेही …
काळ मात्र काही केल्या त्याची परीक्षा घेणे थांबवत नव्हता.
दरम्यान लग्न झाल्यावर आयुष्याला थोडेसे स्थैर्य आले असे वाटत असतानाच बहिणीची जबाबदारी येऊन पडली. त्यातूनही सावरुन आयुष्य रुळावर येत आहे असे वाटत असतानाच मोठ्या भावाला कर्करोग झाला आणि काहीच दिवसात त्यांचा त्यातच दुर्दैवी अंतही…!!
घरकर्ता म्हणुन स्वतःच्या संसारासह छोटया मुली, बहीण, भाच्या, वहिनी, पुतणे , आई या सर्वांची जबाबदारी पेलत असताना काळाने पुन्हा एकदा झडप घातली, आणि कल्याणला मूत्रपिंडाच्या आजाराने घेरलं….
रक्तदाब, मूत्रपिंड यावरील उपचार चालू झाले.
तरीही नाट्यक्षेत्राची सेवा काही थांबली नाही. या क्षेत्रातील कामासाठी मिळणारे मानधन अपुरे असल्याने घरी खानावळ, परीटकाम (लाँड्री), शिवणकाम इत्यादी व्यवसाय करणे चालूच आहे.
यातून सगळ्या लेकरांचे शिक्षण, घरखर्च, औषधोपचार यांचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे पण कल्याण हार न मानता ताठ मानेने ते करतोच आहे.
पण त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी येणारा खर्चही खुप जास्त म्हणजे साधारणपणे १२ लाखापेक्षा अधिक आहे.
तरी आपणा सर्वांना, नाट्यकर्मींना, नाट्यप्रेमींना एकत्र येवून कल्याणसाठी *‘कल्याणनिधी’ संकलित करण्यासाठी, आपला मदतीचा हात देऊन सहकार्य करावे ही विनंती*!!
अशा गुणी कलाकाराच्या उपचाराकरिता आपली *“प्रेक्षकरूपी दाता”* या नात्याने आज आपली गरज आहे. आमच्या या आवाहनाला मान देऊन आपण सहकार्य करावे ही विनंती !!
विनीत….
*समस्त नाट्यकर्मी*
कल्याण कायम, संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला गुरु स्थानी मानून, सतत काहीतरी करण्याच्या धडपडीने शिकत राहिला. अनेक प्रकारे रंगभूमीसाठी सेवा करत आहे. शिवाय टीव्ही मालिका, अनेक लघुपट (शॉर्ट फिल्म्स), नाटके यासाठी पारितोषिके मिळवून आपल्याच विश्वात रमला
*कल्याणची रंगभूमीवरील कारकीर्द*:
१. बालकलाकार म्हणून अनेक बालनाटकात सहभाग
२. नाट्यअभिनेता, सिनेअभिनेता, प्रहसन लेखक, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक म्हणून १९९५ पासून अविरत कामगिरी आणि त्यात कायम उंचावत जाणारी प्रगल्भता.
३. पुणे, मुंबई, कोल्हापूर इत्यादी अनेक ठिकाणी १० दिवस, १५ दिवस ते एक महिन्याच्या निवासी नाट्य शिबिरात सहभाग
४. मुंबईत सहदिग्दर्शक म्हणून (नोकरी) काम
५. २०१३ पासून अनेक वर्षे नाट्यस्पर्धा, युवक महोत्सव, कामगार कल्याण महिला व बालनाट्य स्पर्धा, एम एस इ बी राज्य नाट्य स्पर्धा, राज्य परिवहन महामंडळ नाट्य स्पर्धा
तसेच एकपात्री, नाट्यछटा, अभिवाचन स्पर्धा यांचे परीक्षण
६. पंचवीस (२५) पेक्षा जास्त एकांकिका मध्ये अभिनय आणि दिग्दर्शन
७. तीस (३०) पेक्षा जास्त दोन अंकी नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन
८. “अथ माणूस जगनह:” या नाटकातील भूमिकेसाठी २००२ साली राज्य शासनाचे अभिनय रौप्य पदक तसेच कामगार कल्याण मंडळाचे प्रथम पारितोषिक
९. सलग पाच वर्षे कामगार कल्याण मंडळाची अभिनयासाठी पारितोषिके
१०. “अपराध” आणि “क्राईम डायरी” या मालिकांमध्ये काम तसेच विविध लघुपटात काम
*पुरस्कार यादी*
१. २०१२ साली महाराष्ट्र शासन (पर्यावरण) चा “येस वी कॅन” या शॉर्ट फिल्मला द्वितीय पुरस्कार
२. २०१३ साली मल्हारभूषण पुरस्कार
३. २०२१-२२ साली एनबी न्यूज़तर्फे समाजभूषण पुरस्कार
४. २०२२ साली बालाजी शेळके स्मृती पुरस्कार
५. २०२३ साली आस्था कौशल्य विकास पुरस्कार
६. २०२४ साली स्व. बंकट पुरी स्मृती पुरस्कार

