अभय मिरजकर , लातूर.(9923001824.)

महाराष्ट्रात लातूरची स्वतंत्र ओळख आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ओळख असलेल्या लातूरात मागील ३८ वर्षांपासून सार्वजनिक गुढीच्या स्थापनेची परंपरा सुरू आहे. ज्यावेळी याची सुरुवात झाली तेव्हा कोणालाही वाटले नसेल की ही एक लातूरची नंतरच्या काळात परंपरा होऊन जाईल.
सार्वजनिक गुढीचे संस्थापक पंकज जैस्वाल यांनी सांगितले की, त्यांच्या घरी गुढी बसवण्याची परंपरा नव्हती. शहरातील भोई गल्ली भागातील दत्त मंदिर येथे गुरुवार संगीत क्लब होता. तिथे सर्व जण जमत होते. १९८८ मध्ये सार्वजनिक गुढी बसवण्याचे ठरवले व त्यांच्याच हस्ते पुजा करण्यात आली. त्यानंतर जवळपास चार वर्षे त्या ठिकाणी दरवर्षी गुढीपुजनाचा कार्यक्रम करण्यात येऊ लागला. नंतरच्या वर्षी हनुमान चौकात गुढी उभारली गेली. तिथून पुढे खर्डेकर स्टाॅप येथे गुढी उभारली जाऊ लागली. त्यानंतर गुढीचा प्रवास गांधी चौक, सुभाष चौक, शहरातील प्रसिद्ध असणारी गंजगोलाई असा झाला. सुर्योदयाच्या किरणांसोबत गुढीची उभारणी केली जाते. सायंकाळी सुर्य अस्ताच्यावेळी सन्मानपूर्वक गुढी विसर्जन केले जाते.
समाजातील चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार

मागील काही वर्षांपासून गंजगोलाई येथे गुढी उभारली जाते सोबतच सामाजिक प्रबोधन करण्याचे काम ही केले जाते. झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा, प्लास्टिक चा वापर टाळा, निसर्ग पुजन हा एक प्रमुख उद्देश ठेवला जातो. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या प्रतिनिधींचा छोटेखानी सत्कार पण करण्यात येत असतो. विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांचा यात सहभाग असतो. त्यामुळे गुढीची परंपरा फक्त धार्मिक महत्त्वाची नसून, सामाजिक एकतेचे, सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रतीक बनली आहे.
यासाठी संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल, रामभाऊ जवळगे, संजय सोनकांबळे, धनंजय पाटील,नितीन पडीले, नवनाथ भोसले,रामेश्वर भराडीया, नारायण भुतडा, दिपरत्न निलंगेकर, प्रभाकर चव्हाण,अशोक चव्हाण, रवि बिलगुंदे, प्रकाश शिंदे, हणमंत वंजारे, काकासाहेब घुटे, वामन पाठक, बालाजी नागरगोजे, रवि जाधव,जीवन पारसेवार, डी.एम. काळे, सचिन गांगले दिनेश कबाडे, मार्गदर्शक बसवंत भरडे,बालाजी गवळी, अभय मिरजकर, अरविंद रेड्डी. शेखर हविले, या वर्षीचे विकास कांबळे,स्वागताध्यक्ष अमोल गिते हे परिश्रम घेतात.
लातूरची ही सार्वजनिक गुढी आता पारंपरिक महोत्सवात रूपांतरित झाली आहे.
