
लातूर: दयानंद कला महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन ‘कलातीर्थ २०२६’ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. श्रीमती गुंजन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना गुंजन पाटील यांनी तंत्रज्ञान आणि मानवी अनुभव यातील फरक अधोरेखित केला. त्या म्हणाल्या की, “एक मिनिटाच्या रिल्समध्ये शिक्षण आणि माहिती देणाऱ्या अनेक लिंक येतात. चॅट जीपीटी (ChatGPT) विचारलेली माहिती नक्कीच देते, पण अनुभवाचे बोल फक्त शिक्षकच देऊ शकतात. जगाशी लढण्यासाठी लागणारी ताकद केवळ शिक्षकच देऊ शकतात. जबाबदारी कमी करण्याचे काम शिक्षकांमुळे शक्य होऊ शकते.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये संयम (पेशन्स) ठेवण्याचा सल्ला दिला.

सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन, व्यसन आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी कॅम्पस मधील प्रत्यक्ष मैत्री टिकवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती गुंजन पाटील यांनी आपल्या अनेक कवितांमधून उपस्थितांच्या हृदयाला हात घातला. महाविद्यालयातील प्रेमाची जाणीव करून देताना त्यांनी खालील ओळी सादर केल्या:
“पाहू नको रे मी असे वितळणार नाही,
माझ्या डोळ्यात एक घनदाट जंगल आहे,
तुला रस्ता कळणार नाही.”
प्रेमाबरोबरच अभ्यासाचे महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या,
“प्रेमाचा सिल्याबस तुलाही अवघड कळता कळत नाही, आणि अर्ज तोपर्यंत करत राहायचं जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही.”
विद्यार्थ्यांनी फिल्मी दुनियेतून बाहेर येऊन वास्तव जगावे, असा संदेश त्यांनी या कवितेतून दिला.
“केवळ फिल्मी दुनियेत लागतो खजाना हाती
अमीर बापाची पटेल आपल्याला इतकं नशीब फळणार नाही.”
तरुणाईला कडक इशारा देताना त्यांनी म्हटले की,
“जरा मेहनत करा प्रेमात सारे हिशोब तपासले जातात, कोणतीच लैला तुमच्यासाठी आयुष्य उधळणार नाही.” तसेच, सध्याच्या काळातील प्रेमातील बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना त्यांनी म्हटले,
“प्रेम आला तर येऊ दे गेलं तर जाऊ दे
एकदा पारखून घे ती घर तर जाळणार नाही.”
अशा शब्दांत त्यांनी प्रेमातील भ्रष्टाचारावर ओढलेले ताशेरे शिक्षकांच्या दाद मिळवून गेले. अलीकडच्या काळातील परिस्थितीवर उपरोधिक टोला लगावताना त्या म्हणाल्या,
“खरंच पोरी धोकेबाज असतात
आधी प्रेमात पडतात काही दिवस मजेत जगतात
मग याला सोडून दुसऱ्या बरोबर जातात.”
स्त्री जीवनातील संघर्षाचे वर्णन करताना त्यांनी अत्यंत भावनिक ओळी सादर केल्या:

“बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईने सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही मागितलं.
लेक घरची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे,
मीही मुक्याने मान डोलवत कधी काही नाही मागायचे.”
या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले की, मुलींच्या हातात आज लॅपटॉप आला असला तरी समाजव्यवस्थेने त्यांच्या हातातील पोळपाट आणि लाटणे काढून घेतलेले नाही. “अॅसिड टाकणारा हात पुरुष का असतो आणि स्टोव्हच्या भडक्याने स्त्रीच का जळते?” असे वास्तव वर्णन त्यांनी कवितेतून केले. यावेळी त्यांनी बारावी बोर्ड व विद्यापीठ परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. स्नेहसंमेलनात भारुड, लावणी, छक्कड, सामूहिक नृत्य आणि एकपात्री अभिनय अशा कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. रंगीबेरंगी रोषणाई आणि वाद्यांच्या तालावर विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. प्रा. डॉ. अंकुशकुमार चव्हाण व डॉ. सुधीर गाडवे यांनी पारितोषिक वितरणाचे वाचन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, स्नेह संमेलन प्रभारी प्रा. डॉ. रमेश पारवे, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, श्रीमती जयमाला गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. संतोष पाटील, श्री. संजय व्यास यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जान्हवी काळे व कु. एकता पुरोहित यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. रीशा जवळगेकर हिने मानले.
