
मुंबई, प्रतिनिधी :
देशाचे माजी पंतप्रधान यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील आठवणींचा वेध घेणाऱ्या ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते मंगळवारी महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे संपन्न झाले. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या ग्रंथाचे लेखन त्यांचे माजी माध्यम सल्लागार यांनी केले आहे.
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना सांगितले की, “अटलजींच्या विचारांनी आणि कार्याने प्रेरित होऊन आपण सार्वजनिक जीवनात आलो. भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता आणि नीतिमत्ता शिकायची असेल तर त्यांनी अटलजींचे सार्वजनिक जीवन अभ्यासले पाहिजे.”

अटलजी हे नेता कसा असावा आणि विरोधी पक्षनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण होते, असे सांगून राज्यपालांनी त्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा आणि विचारशील नेतृत्वाचा उल्लेख केला. उत्तरपूर्व भारतात पक्षकार्य करताना अटलजींनी कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा दिली. विरोधी पक्षात असताना जसे ते होते तसेच पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि मूल्यनिष्ठा कायम राहिली, असे त्यांनी नमूद केले.
राज्यपालांनी अटलजींच्या भारतीयतेच्या विचाराचा संदर्भ देत सांगितले की, विविधतेतील एकता हीच भारताची खरी ओळख आहे. नैतिकतेचा ऱ्हास होत असलेल्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अणुऊर्जा यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना मूल्ये आणि नीतिमत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अटलजींनी राजकारणात कधीही शॉर्टकट स्वीकारला नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘अटल संस्मरण’ प्रेरणादायी दस्तावेज – आशिष शेलार
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी ‘अटल संस्मरण’ हा उच्च साहित्यिक मूल्य असलेला आणि अटलजींच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण दस्तावेज असल्याचे सांगितले.
अटलजींचे जीवन संघर्षमय होते, मात्र त्यांच्या विचारांमध्ये आणि आचारांमध्ये कधीही कटुता नव्हती. ते उत्तम वक्ते, सुसंस्कृत राजकारणी आणि लोकशाही मूल्यांचे समर्थक होते. संवाद आणि सहमतीच्या राजकारणाची शिकवण त्यांनी देशाला दिली, असे शेलार यांनी नमूद केले.
अटलजींनी देशाला अणुऊर्जा संपन्न केले तेव्हा अनेक आव्हाने आली, मात्र त्यांनी देशहिताच्या निर्णयांपासून माघार घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले. कवी मनाचा हळवा स्वभाव आणि प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता हे अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी लेखक अशोक टंडन यांनी अटलजींसोबतच्या सहा वर्षांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. पंतप्रधानपदावरील त्यांचा कार्यकाळ, १३ दिवसांच्या सरकारच्या काळातील घडामोडी आणि विविध राजकीय अनुभव या पुस्तकातून मांडले असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक अटलजींना वाहिलेली श्रद्धांजली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकाशन सोहळ्यास प्रसिद्ध गायक , रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांच्यासह साहित्य, कला, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचार, नेतृत्व आणि मूल्यनिष्ठ राजकारणाची आठवण करून देणारा ‘अटल संस्मरण’ ग्रंथ भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

