
▪️बोरफळ येथे माहिती व जनसंपर्क विभागाचा ‘लोकसंवाद’ उपक्रम
लातूर, दि. २१ : राज्याच्या कृषि विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार एआय’ ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकर्यांना शेतीविषयी अचूक माहिती आणि मदत एकाच क्लिकवर मिळणार असल्याचे कृषि विभागाचे सूर्यकांत लोखंडे यांनी सांगितले.
गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत औसा तालुक्यातील बोरफळ येथील चौकातला राजा गणेश मंडळाच्या सहकार्याने लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे डॉ. ऋषिकेश खारोळकर, कौशल्य विकास अधिकारी गिरीश महामुनी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, विभागीय माहिती कार्यालयातील सहायक अधीक्षक अशोक माळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला, पीक प्रमाणित कार्यपद्धती, हवामानाचा अचूक अंदाज, खत मात्रा गणक, कीड – रोग ओळख व यावर उपाय, पिकांचे बाजारभाव, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, गोदाम उपलब्धता याविषयीची माहिती ‘महाविस्तार एआय’ ॲपवर एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होते. यातील चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांनी तोंडी विचारलेल्या प्रश्नांना अचूक व अधिकृत उत्तरे मिळतील, असे श्री. लोखंडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कक्षाची कार्यपद्धती आणि कक्षामार्फत वैद्यकीय कारणांसाठी सहाय्य मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबाबत डॉ. ऋषिकेश खारोळकर यांनी सविस्तर माहिती दिली.
पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत लातूर जिल्ह्यात मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी १३ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभामध्ये स्थानिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे तसेच इतर ठिकाणच्या नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. या रोजगार महाकुंभामध्ये १० वी, १२ वी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा (सर्व ट्रेड) तसेच इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या सर्व उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी कौशल्य विकास अधिकारी श्री. महामुनी यांनी केले.

यावेळी चौकातला राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष जीवन मारुती यादव, उपाध्यक्ष माऊली रमेश यादव, सचिव सुरवसे ईश्वर ज्ञानेश्वर यांच्यासह रोहित हंचाटे, गणेश जाधव, गणेश मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटयांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
