
लातूर (प्रतिनिधी) : भारत शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचलित जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय युवक-युवती नेतृत्व विकास शिबीर’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या शिबिरात “नेतृत्व विकास आणि युवकांपुढील आव्हाने” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयक्रांती महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सतीश डांगे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे यांनी शिबिराच्या उद्दिष्टांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समाजाभिमुख नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख वक्ते डॉ. संदीपान जगदाळे यांनी आपल्या भाषणात आजच्या युवकांसमोरील विविध आव्हानांवर परखडपणे भाष्य केले. “आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास तो विकासाचा मार्ग ठरतो; मात्र अतिरेक प्रगतीस अडथळा ठरतो,” असे ते म्हणाले. मोबाईलचा वाढता वापर, शारीरिक श्रमाकडे दुर्लक्ष, अभ्यासातील एकाग्रतेत घट आणि कुटुंबीयांशी कमी होणारा संवाद या बाबींवर त्यांनी चिंता व्यक्त केली.
तसेच फेसबुक, इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे बदलत चाललेले सामाजिक संबंध, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यावरही त्यांनी भाष्य केले. युवकांनी विवेकाने निर्णय घेऊन मूल्याधिष्ठित जीवन जगावे आणि कुटुंबीयांशी सुसंवाद राखावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
“युवकांनी तंत्रज्ञानाचा समतोल वापर करून सर्वांगीण विकास साधावा, नेतृत्वगुण जोपासावेत आणि समाजासाठी जबाबदारीने कार्य करावे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव आलगुले, डॉ. प्रमोद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिराचे नियोजन व आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता व सामाजिक जाणीव वाढीस लागून भविष्यात सक्षम नेतृत्व घडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
