
लातूर : लातुरात दि. २८ व २९ मार्च २०२६ रोजी मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या ‘ मानसरंग ‘ नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च सेंटरचे संचालक – लातूरचे ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी दिली. या नाट्यमहोत्सवात दोन दिवसांमध्ये एकूण चार नाटके सादर होणार आहेत.
शनिवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संत तुकाराम महाराज यांचा सामान्य माणूस ते भक्त , भक्त ते देव व देवत्वापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणारे ‘ आनंदओवरी’ हे नाटक होणार आहे. यामध्ये डॉ.मिलिंद पोतदार यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. प्रख्यात लेखक दि. बा. मोकाशी यांनी लिहिलेल्या कथानकाची नाट्य आवृत्ती अतुल पेठे यांनी केली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन श्रुतिकांत ठाकूर यांनी केले आहे. दुपारी अडीच वाजता लेखक च.प्र. देशपांडे यांनी लिहिलेले व अभिजित झुंजारराव यांनी दिग्दर्शित केलेले ‘मन’ हे नाटक सादर होईल. यंत्रमेश वाणी यांनी भूमिका साकारली आहे. रविवार, दि. २९ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता ‘ मग तू मला खा’हे नाटक सादर होणार आहे. लेखन व दिग्दर्शन विभावरी देशपांडे यांनी केले आहे. या नाटकात अनन्या रत्नपारखे, दीप मेहंदळे, गौतमी अहेर , वेदांत रानडे, हर्षद राजपाठक, ऋचा आपटे यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. तर रविवारी दुपारी अडीच वाजता ‘तो राजहंस एक ‘ हे नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक दत्ता पाटील हे असून दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले आहे. या नाटकामध्ये प्राजक्त देशमुख, अमेय बर्वे, धनंजय गोसावी, हेमंत महाजन व अनिता दाते हे कलाकार आपले कलाविष्कार सादर करणार आहेत.

प्रत्येक नाटकांच्या सादरीकरणानंतर त्यातील कलाकार, लेखक , दिग्दर्शक व मानसोपचार तज्ञ यांचे चर्चासत्रही होणार आहे. त्यामध्ये मानसिक आरोग्याचे विविध पैलू उलगडले जाणार आहेत. हा नाट्यमहोत्सव विनामूल्य असला तरी त्यासाठी आगाऊ नोंदणी करणे व प्रवेश पत्रिका असणे बंधनकारक असल्याचे डॉ. मिलिंद पोतदार यांनी सांगितले. या नाट्य महोत्सवाचे आयोजक सोसायटी फॉर वेलबिइंग अवेअरनेस अँड रिहॅबिलिटेशन ( स्वर ), अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आणि सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च सेंटर हे आहेत.
————-
