*वीजग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन*
*लातूर , दि. ७ फेब्रुवारी :* सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन मिळावे याकरिता महावितरण कंपनी आणि सोलर बीएनआय या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लातूर जिल्हयातीलइच्छूक वीजग्राहकांचा मेळावा आज (दि.७) आयोजीत करण्यात आला आहे. सौरऊर्जा विषयक विविध योजनांची माहिती हवी असणाऱ्या वीजग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरातील हॉटेल पार्थ एक्झकेटीव्ह, अंबाजोगाई रोड येथे शुक्रवार दि.७ फेब्रुवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या वीजग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा उद्देश सौर ऊर्जेच्या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणे व शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.
केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून प्रधानमंत्री सूर्य घर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजना राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने वीजग्राहकांना सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन मिळावे यासाठी महावितरण व सोलर बीएनआय या सामाजिक संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून राज्यभरात सौरऊर्जा जनजागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे केंद्र सरकार घराच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली बसवणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते. मेळाव्यातून या योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया, शासकीय अनुदान आणि शाश्वत भविष्य याबद्दल माहिती दिली जाणार आहे. याप्रसंगी सौर ऊर्जा प्रणाली बसवणाऱ्या तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असून यावेळी महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधीही वीज ग्राहकांना मिळणार आहे.
हा कार्यक्रम घरगुती, व्यावसायिक वीजग्राहकांसोबतच सौर ऊर्जा स्वीकारण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. लातूर व परिसरातील नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. मेळाव्यास उपस्थित राहू इच्छीणाऱ्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयकांशी ७७७००२४४६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

