
लातूर परिमंडळातील १९ हजार २८ शेतकऱ्यांचे दिवसा सिंचनाचे स्वप्न पुर्णत्वास
गेल्या पाच महिन्यात लातूर जिल्हयातील १३ तर बीड मध्ये ५ व धाराशिव मधील २ प्रकल्प कार्यान्वित
लातूर,दि. १० मार्च : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे, या योजने अंतर्गत लातूर, बीड व धाराशिव जिल्हयांचा समावेश असलेल्या लातुर परिमंडळांतर्गत गेल्या पाच महिन्यात ७१ मेगावॅट क्षमतेचे २० सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत. यामध्ये लातूर जिल्हयातील ५० मेगावॅट क्षमतेचे १३ प्रकल्प, बीड जिल्हयातील १५ मेगावॅट क्षमतेचे ५ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर धाराशिव जिल्हयातील ६ मेगावॅट क्षमतेचे २ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. याप्रकल्पांमुळे लातूर परिमंडळाततील १९ हजार २८ शेतकऱ्यांचे दिवसा सिंचनाचे स्वप्न पुर्णत्वास आले आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. याव्दारे राज्यात एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल. या योजनेत महावितरणच्या वीजउपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्याने शासकीय जमिनी घेण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत लातूर परिमंडळात जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
लातूर जिल्हयातील ३३/११ केव्ही रेणापूर, ममदापूर, मंगरूळ, तळणी, लामजना, भांतागळी, शिवणखेड, बीटरगाव, कुमठा, झरी, पोमादेवी जवळगा, तपसे चिंचोली व खरोसा उपकेंद्रात एकूण ५० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत. बीड जिल्हयातील बर्दापूर, खालापुरी, उमापूर, दौडवडगाव व मीरगाव येथे एकूण १५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वीत झाले आहेत. तर धाराशिव जिल्हयातील शहापूर व नारंगवाडी येथे प्रत्येकी ३ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वीत झाले आहेत. यामुळे सदरील २० उपकेंद्रातून निघणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांवरील १९ हजार २८ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. दिवसा वीजपुरवठा होत असल्यामुळे शाश्वत शेती करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे सफल झाले आहे.

