
लातूर शहरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या दाहकतेला तोंड देत आहेत. आधी पिवळट आणि आता चक्क काळं पाणी नळाद्वारे पुरवले जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघेही अपयशी ठरले असून, लातूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा हा प्रकार सुरू आहे.
राजकारण्यांचे केवळ आश्वासनांचे ढग!
दर निवडणुकीला लिंबोटी, उजनी आणि नवनव्या प्रकल्पांचे गाजर दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात लातूरकरांचे तोंड काळ्या पाण्याने धुतले जाते. नागझरी साई आणि डोंगरगाव येथील पाणी सहज उपलब्ध होऊ शकते, परंतु महापालिका आणि प्रशासन केवळ डोकं जमिनीत खुपसून बसल्यासारखे वागत आहेत.

लातूरकरांचा उद्रेक अनिवार्य!
शहरातील चळवळीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रशासनाने त्वरित सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला जात आहे. लातूरकर किती दिवस ही ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा सहन करणार? लोकप्रतिनिधींना आता जाब विचारणार की पुन्हा त्यांच्याच आश्वासनांना बळी पडणार? याचा फैसला येत्या काही दिवसांत होणार आहे!

