लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई दि. २१ मार्च २०२५ : लातूर शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिवळ्या आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून दूषित पाण्याची समस्या तत्काळ सोडवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा, वाहतूक समस्या तसेच स्वच्छता व्यवस्थेच्या अनुषंगाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी लातूर शहराच्या नागरी समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा
लातूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट केले की, यंदा पाऊस चांगला झाल्याने सध्या कोणतीही पाणीटंचाई नाही. यावर बोलताना, दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आल्यास तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिकेला रिकाम्या प्लॉट्समध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच, गो ग्रीन गॅलरी, रूफ वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे उपक्रम राबवले जात असून सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी सेप्टिक टॅंक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
वाहतूक व्यवस्थापन आणि रिंग रोडचा उपयोग
शहरातील वाढती वाहतूक आणि मुख्य चौकातील कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन, रिंग रोडचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा असे निर्देश दिले गेले. शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त नियोजन करावे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
विकास आराखडा आणि नियोजन
लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद चिकित्सालय आणि कृषी विभागाच्या प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यासोबतच, बस स्थानकाच्या विस्तारासाठी आणि नवीन पर्याय शोधण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अवकाळी पावसाची तयारी आणि पूर्वसूचना यंत्रणा
अवकाळी पावसामुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी, पूर्वसूचना यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
त्याचबरोबर बैठकीच्या शेवटी, महानगरपालिकेच्या आयुक्तांसह, जिल्हाधिकारी यांनी ठोस निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे उपस्थित होते. तसेच, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, डॉ. उदय मोहिते (डीन मेडिकल कॉलेज), सिव्हील सर्जन डॉ. ढेले हे ऑनलाइन उपस्थित होते.

