
लातूर : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात काल (गुरुवारी) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे नागेवाडी येथील शेतकरी धोंडीराम हिप्पाळे यांच्या दीड एकर आंबा बागेचे तब्बल ६० टक्के नुकसान झाले आहे. गतवर्षीही असाच पाऊस झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, त्यावेळी त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नव्हती.


या वेळी तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय तालुक्यातील इतरही भागांमध्ये आंबा बागांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. शासनाने याकडे गांभीर्याने पाहून तत्काळ मदतीसाठी आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

