
येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठान च्या वतीने आज रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी गणेश हॉल अष्टविनायक मंदिर लातूर येथे एकदिवसीय नाट्यसंगीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे.
येथील आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी मासिक संगीत सभेच्या सोबतच अशा अनेक कार्यशाळांचे आयोजन सातत्यपूर्ण आज पर्यंत करण्यात आले आहे. असेच नाट्यसंगीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे.

तसे पाहिले तर मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला …अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ म्हणावा लागेल.

आज आपण पाहतो नाट्यसंगीत ऐकणारा श्रोता वर्गही मोठ्या संख्येने आहे व नाट्यसंगीत गाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे, आपल्याकडे अनेक जण नाट्यसंगीत गातात परंतु नाट्यसंगीत गाण्याची नेमकी पद्धत काय नाट्यसंगीता चा विस्तार आणि शास्त्रीय संगीताचा विस्तार यामध्ये फरक काय आहे नाट्यसंगीताचा विस्तार कशा पद्धतीने केला जातो, राग शास्त्राचे नियम याला किती पटीने लागू होतात तसेच विविधतालातील नाट्यसंगीत व त्याचे सादरीकरण कसे करावे या संदर्भात विस्तृत व शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील प्रसिद्ध नाट्यसंगीत गायिका विदुषी अर्चना कान्हेरे यांची एकदिवसीय नाट्यसंगीत प्रशिक्षण कार्यशाळा येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीनेआयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून काही नाट्यगीते विस्तारासह शिकवली जाणार आहेत , या नाट्य संगीत प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी संगीत साधकांना कोणतीही वयाची अट नाही कोणीही या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतात, सहभागी होण्यासाठी ( ८२०८६९०७१२ ) क्रमांकावर आपल्या नावाची नोंदणी करून आपण सहभाग नोंदवावा व या अविस्मरणीय अशा कार्यशाळेचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

