
लातूर – श्री. देशिकेंद्र विद्यालय, सिग्नल कॅम्प, लातूर येथे मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रातील घोटाळा उघडकीस आला आहे. माहिती अधिकार कायदा-2005 अंतर्गत मागविलेल्या कागदपत्रांनुसार, खुडे स्नेहलकुमार नामदेवराव यांची प्रथम नियुक्ती, सेवा सातत्य आणि शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासंदर्भात गंभीर अनियमितता समोर आली आहे.
बनावट दस्तऐवज आणि नियमबाह्य भरती
मिळालेल्या माहितीनुसार, शासन निर्णयाची पायमल्ली करून निर्बंध असतानाही खुडे एस.एन. यांची बोगस भरती करण्यात आली. संबंधित आदेशांना वैधता नसल्याचे पुराव्यांद्वारे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, त्यांना देण्यात आलेली मान्यता आणि सेवा सातत्याचे आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्याध्यापिकेवर गंभीर आरोप
माजी मुख्याध्यापिका कल्याणी एस. के. यांनी 01 सप्टेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत पदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दस्तऐवजांच्या आधारे स्पष्ट झाले आहे की, त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून बोगस भरतीला पाठबळ दिले.
संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
या प्रकरणी खुडे स्नेहलकुमार नामदेवराव, मुख्याध्यापिका कल्याणी एस. के., तसेच ठेकेदार सहशिक्षक मुसळे ए. जे. आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून कारवाईची अपेक्षा
या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या घोटाळ्याची शक्यता निर्माण झाली असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आता प्रशासन या भ्रष्टाचारप्रकरणी काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(लातूर प्रतिनिधी)

