
जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉलचे ग्राउंड तब्बल दीड वर्ष दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले. यामागे ठेकेदाराचे लाड आणि तत्कालीन क्रीडामंत्र्यांचे राजकारण होते, अशी चर्चा त्या काळात रंगली होती. मात्र, वेळोवेळी माध्यमांनी आवाज उठवून आणि खेळाडूंनी निवेदनांच्या माध्यमातून संघर्ष करून अखेर डीपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले आणि फक्त तीन दिवसांत ग्राउंड तयारही झाले!
पण आता या ग्राउंडवर खेळाचे ड्रीब्लिंग नव्हे, तर उद्घाटन कोण करणार याचे राजकारण सुरू झाले आहे. ग्राउंड तयार असूनही अद्याप खेळाडूंना सरावासाठी खुले करण्यात आलेले नाही. खेळाडू वाट पाहत आहेत खेळाची, आणि नेते वाट पाहत आहेत मिरवणुकीची.

प्रश्न असा निर्माण होतो की, तयार असलेले ग्राउंड वापरासाठी का खुले केले जात नाही? प्रशासन उद्घाटनाच्या नावाखाली खेळाडूंच्या सरावाचा वेळ वाया घालवत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.
क्रीडाप्रेमींची एकच मागणी आहे —
“क्रीडांगण हे खेळासाठी असते, राजकारणासाठी नाही!”
जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून हे ग्राउंड खेळाडूंना खुले करून द्यावे, हीच अपेक्षा.

बोलावं तर इतकंच —
खेळाडू तयार आहेत… आता फक्त दरवाजे उघडण्याची गरज आहे!

