
लातूर – येथील शारदा संगीत महाविद्यालयाच्या वतीने दिनांक २६, २७ व २८ एप्रिल २०२५ रोजी तीन दिवसीय तबला वादन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दररोज सकाळी ७.०० ते १२.०० व दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत, अशा एकूण सहा सत्रांमध्ये संपन्न होणार आहे.
सोलापूर येथील सुप्रसिद्ध व प्रथितयश तबला वादक पं. आनंद बदामीकर यांचे अमूल्य मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे. तबला वादनातील विविध पैलूंवर विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेत प्रमुखतः विविध घराण्यांचा बाज व त्याची वादनशैली, लय-लयकारी, पेशकारची उपज, विविध तालांचे विलंबित लयीतील ठेके, गायन-वादनासोबत साथसंगतीचे तंत्र, बोलांची निकास व रियाजाचे तंत्र अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा गणेश हॉल, आष्टविनायक मंदिर, लातूर येथे होणार आहे. प्रारंभिक ते अलंकार स्तरावरील तसेच विविध शाळा, महाविद्यालये व खाजगी संगीत संस्थांमधील तबला वादक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शारदा संगीत महाविद्यालयाचे संचालक श्री. संजय सुवर्णकार, आरोह संगीत अकादमीचे प्रा. शशिकांत देशमुख, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी व प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले आहे.

