
मानवी जीवनात काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे अस्तित्व केवळ शरीरापुरते मर्यादित नसते, तर ते एक विचार असतात, एक चळवळ असतात, एक संस्कार असतात… आणि अशाच अजरामर व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे आदरणीय दत्तात्रय बनसोडे गुरुजी — एक जीवंत विद्यापीठ, एक तेजस्वी दीपस्तंभ आणि हजारो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान.
गुरुजींच्या निधनाने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख पाहिला तर लक्षात येते की, त्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपली स्वतंत्र छाप उमटवली. जयकिसान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पेलल्या.
गुरुजी केवळ अध्यापक नव्हते, ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या एकेक शब्दांत ज्ञानाचे झरे वाहायचे. त्यांचं मार्गदर्शन हे केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित नव्हते, तर ते जीवन जगण्याची दिशा दाखवणारे असे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला, त्यांना स्वप्नं पाहायला शिकवलं आणि ती स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी प्रेरणा दिली.
“आम्ही पराग या फुलातले, त्यातले गंध तुम्ही” — ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे. गुरुजींनी दिलेली शिकवण, त्यांची करारी पण प्रेमळ शिस्त, आणि वेळोवेळी दिलेली जीवनदृष्टी हीच खरी संपत्ती आहे जी त्यांच्या जाण्यानंतरही आपल्यासोबत कायम राहील.
गुरुजींच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पत्नी विमलताई, सुपुत्र जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ श्री. शिरीष बनसोडे, अॅड. सुमेध बनसोडे, मुली मीराताई, रोहिणीताई, डॉ. गौतमी, जावई प्रा. शीवशरण हावळे आणि नातवंडे अशा समृद्ध कुटुंबाचा वारसा आहे.
गुरुजी हे खर्या अर्थाने दीपस्तंभ होते — स्वतः जळत राहून इतरांना उजळवणारे. त्यांची स्मृती आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीत प्रेरणादायी ठरेल.
बुद्धवासी दत्तात्रय बनसोडे गुरुजींना कोटी कोटी नम्र श्रद्धांजली.
तुमचा प्रकाश आमच्या वाटचालीस सदैव दिशा देत राहील…

