
लातूर, ११ : उन्हाळ्याच्या कडाक्याने होरपळून निघणाऱ्या मुक्या पक्ष्यांसाठी दयानंद शिक्षण संस्था परिसरात ठिकठिकाणी पाणपोई उभारण्यात आली असून, ही कल्पना आणि अंमलबजावणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक अधिराज जगदाळे याने स्वतःच्या पॉकेट मनीमधून साकारली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा जीव जातो. नाले, नदी आणि इतर नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होते. यासाठी सामाजिक भान ठेवत अधिराजने पुढाकार घेतला असून, हा उपक्रम पर्यावरणसंवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

या उपक्रमाचे कौतुक करता करताना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी निसर्गातील जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे चिमणीसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले.
डॉ. अंजली जोशी यांनी शहरीकरणामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे नमूद करत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आजची पिढी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यासही मुकली आहे. म्हणूनच अशा उपक्रमांची गरज अधिक भासत आहे.”
उन्हाच्या तीव्रतेमुळे मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून, अवैध वृक्षतोड आणि सिमेंटची जंगले यामुळे नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत. या संदर्भात उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी पक्ष्यांच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तर राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. संदीपान जगदाळे यांनी प्राणी-पक्ष्यांचे निसर्गसाखळीतील स्थान स्पष्ट करत, त्यांचे संगोपन व संवर्धन अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष कदम म्हणाले की, "हा छोटासा पण महत्त्वपूर्ण उपक्रम निसर्गस्नेही सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवणारा ठरत आहे."
अधिराजच्या या उपक्रमातून प्रेरणा घेत दयानंद कला महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या घरीही पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्याचा संकल्प केला.रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पवार, श्रीनिवास बरीदे, सुरज गोरे,निकिता कापसे,श्रद्धा नरसिंगे,अनुषा पिटले,संजय जाधव,साईकिशन सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, रा. से. यो. जिल्हा समन्वयक डॉ. केशव अलगुले, डॉ. रामेश्वर खंदारे, बालकिसन अडसूळ,कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले.


