
अतनूर / प्रतिनिधी
धार्मिक श्रद्धा, गाव एकत्रितता आणि परंपरेचा वारसा यांचे सुंदर मिश्रण म्हणजे अतनूर येथील हरिनाम सप्ताह. श्री. घाळेप्पा स्वामी महाराजांच्या संजीवन समाधी स्थळी व ग्रामदैवत श्री. काशी विश्वनाथ महाराज मंदिरात झालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सोमवारी भक्तिभावात सांगता झाली.

या सप्ताहात नवनाथ डोंगरशेळकीकर महाराज यांचे काल्याचे आणि ब्रह्मानंद स्वामी, विश्वनाथ स्वामी यांचे गुलालाचे कीर्तन भाविकांसाठी अध्यात्मिक पर्वणी ठरले. रोज पहाटे काकड आरती, गावात पालखी मिरवणूक आणि भजन, दिंड्या या कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हालेला दिसून आला.

फटाक्यांची आतषबाजी, भजनी मंडळांचा गजर आणि विविध गावांतील भाविकांचा सहभाग यामुळे हा सप्ताह गावाच्या सामाजिक एकतेचा प्रतीक ठरला. अनेक नामवंत ग्रामस्थ, कार्यकर्ते, वयोवृद्ध, महिला आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
गेल्या १४९ वर्षांपासून श्री. काशी विश्वनाथ महाराज आणि श्री. घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या कृपेमुळे नवसाला पावणारा हा सप्ताह पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान ठरलेला आहे.
आजच्या गतिमान युगातही ही परंपरा टिकवून ठेवणाऱ्या अतनूर ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. समाजास एकत्र आणणारा, संस्कारांचे बीज पेरणारा आणि नवपिढीला आपल्या मुळांशी जोडणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणास्थान ठरावा.

