
मुंबई : मराठवाड्यातील शिक्षणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून नावारूपाला आलेल्या लातूर शहराच्या शैक्षणिक प्रगतीला पुढील गती मिळावी यासाठी आता स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेची जोरदार मागणी होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे लातूरची शैक्षणिक भरारी, परिसरातील वाढती विद्यार्थ्यांची संख्या, लातूर पॅटर्नची देशव्यापी ओळख आणि शैक्षणिक संस्थांची विस्तारलेली यंत्रणा लक्षात घेता, लातूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना ही काळाची गरज असल्याचा ठाम आग्रह समितीने व्यक्त केला.
लातूरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि कृती समितीचे मुख्य संयोजक अॅड. प्रदीपसिंह गंगणे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव मंत्रिमहोदयांना देण्यात आला. यावेळी सुरेश थोरात, अॅड. सुहास बेंद्रे यांच्यासह कृती समितीचे इतर सदस्यही उपस्थित होते.
लातूर शहराने मागील काही दशकांत शिक्षणाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. येथील ‘लातूर पॅटर्न’ ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक मानद संज्ञा बनली असून, राज्यात आणि राज्याबाहेरही त्याची प्रभावी छाप आहे. मेडिकल, इंजिनीअरिंग, आयआयटी, नॅशनल लॉ स्कूल्स, यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या परीक्षांत लातूरमधील विद्यार्थी सातत्याने घवघवीत यश मिळवत आहेत.
या शैक्षणिक यशामागे लातूरमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणसंस्था, अनुभवसंपन्न शिक्षकवर्ग आणि कठोर परिश्रम करणारा विद्यार्थीवर्ग आहे. परंतु अद्यापही लातूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची सुविधा नाही, हे दुर्दैवी चित्र असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.
स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाल्यास विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर संशोधन, पदव्युत्तर शिक्षण व इतर शैक्षणिक सुविधा सहज मिळतील. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीही उच्च शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पालकमंत्र्यांनी निवेदन स्विकारून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या पातळीवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांची पाहणी करून संबंधित विभागांशी समन्वय साधून पुढील प्रक्रिया राबवली जाईल.
या मागणीमुळे जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. कृती समितीनेही लातूरकर जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले असून, लवकरच व्यापक जनजागृती आणि पाठिंबा मिळवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे संकेत दिले आहेत.
लातूरच्या शैक्षणिक स्वाभिमानासाठी ही एक निर्णायक लढाई ठरण्याची शक्यता असून, ही मागणी केवळ विद्यापीठापुरती मर्यादित न राहता, मराठवाड्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाची दिशा ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

