
लेखक : दीपरत्न निलंगेकर, संपादक – दैनिक युतीचक्र, लातूर
सोमवार, दि. २६ मे २०२५ – ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासातील एका सुवर्णपानाची आठवण करून देणारी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लातूरचे सुपुत्र, जनतेच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ८० व्या जयंतीचे औचित्य.
बाभळगाव सारख्या छोट्या गावात सरपंच पदापासून सुरू झालेला विलासरावांचा प्रवास म्हणजे एक प्रेरणास्पद महायात्रा. गावकुसाबाहेरचे राजकारण त्यांनी केवळ जिंकलेच नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून समृद्ध केले. दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि नंतर केंद्र सरकारमध्ये जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपली कार्यक्षमता, संवेदनशीलता, आणि दूरदृष्टी यांचे उत्तम उदाहरण घालून दिले.
मंत्रालयात आज जिथे सामान्य माणसाला प्रवेश मिळणे अशक्यप्राय असते, तिथे विलासराव स्वतः सामान्यांच्या व्यथा ऐकत. एखाद्या परिट समाजातील महिलेच्या व्यवसायासाठी जागा देणे, रस्त्यावर अडकलेल्या जेष्ठ नागरिकाला मंत्रालयात सहज प्रवेश मिळवून देणे, हे प्रसंग केवळ कथा वाटाव्यात इतके विलक्षण. त्यांच्यामुळे मंत्रालयाचा दरवाजा सामान्यांसाठी उघडा राहिला.
लातूरचे रूप पालटणारे नेतृत्व म्हणून त्यांनी अनेक निर्णय घेतले – विभागीय कार्यालये, पाणीपुरवठा योजना, शिक्षणातील निर्णय, सहकार क्षेत्रातील पुढाकार हे सारे त्यांच्या दृष्टीकोनाचे मूर्त रूप होते. लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेश निकषात बदल करणे, आंदोलक विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या मान्य करणे हा लोकाभिमुखतेचा सर्वोच्च नमुना होता.
त्यांच्या काळात लातूरमध्ये साखर कारखान्यांची निर्मिती, मांजरा कारखान्याचा उत्कर्ष, आणि ग्रामीण भागात आर्थिक क्रांती ही त्यांच्या योजनांची फळे होती. शेतकऱ्यांच्या जीवनमानात झालेली सुधारणा हे त्यांच्या कृषीपुरक औद्योगिक धोरणाचे फलित होते.
राजकारणात ठामपणा, वक्तृत्वात प्रभाव, आणि समाजकार्यांतून लोकसंपर्क – या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या सर्व स्तरांना एकत्र आणले. त्यांच्या भाषणांमध्ये कलाकारांचं कौतुक, शास्त्रीय संगीताची आवड, आणि आपल्या मातीशी असलेली नाळ जपत त्यांनी एक सुसंस्कृत आणि लोकाभिमुख राजकारणी अशी प्रतिमा निर्माण केली.
दोन दिवाळींचा उत्सव आणि एक अपूर्व प्रवास
सन 2003. लातूरच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण. लातूरकरांनी त्या वर्षी अक्षरशः दोनदा दिवाळी साजरी केली. कारणही तसंच होतं – लातूरच्या लाडक्या नेत्याला, विलासराव देशमुखांना, दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मान लाभला होता. संपूर्ण लातूर जल्लोषात न्हालं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची उधळण होती.
तेव्हाच मी, दूरदर्शनचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्या वर्षी मला दूरदर्शन प्रतिनिधींच्या राज्य संघटनेच्या राज्य चिटणीस पदाची संधी मिळाली. विलासरावजी मुख्यमंत्री झाले होते, आणि मी ठरवलं – राज्यभरातील प्रतिनिधींना एकत्र करून, या नेत्याविषयीची जनभावना एका माहितीपटात पकडायची.
मी सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी संपर्क साधला. प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना पुढे करत, विलासरावजींवरच्या भावना, अभिप्राय आणि शुभेच्छा पाठवल्या. लातूरमधील त्यांच्याच विविध दौऱ्यांचं मी केलेलं चित्रीकरण वापरून ‘जाणता राजा’ नावाचा माहितीपट तयार केला.
माहितीपट उत्कृष्ट झाला. लोकांचा प्रतिसाद प्रचंड होता. मी ठरवलं – या माहितीपटाचं विमोचन थेट सोनिया गांधींच्या हस्ते व्हावं! दिल्ली गाठली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते महादेवन यांच्याकडून अपॉइंटमेंट मिळवली. सगळं ठरत असतानाच, अचानक दिल्लीमध्ये स्फोट झाला. सगळीकडे सुरक्षा वाढली. माझी अपॉइंटमेंटही रद्द झाली.

पण मी दिल्ली सोडली नाही. योग्य संधीची वाट पाहत राहिलो. अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे पोचलो. त्यांनी आनंदाने सीडीचं विमोचन केलं. मी त्यांना एक विनंती केली – ही सीडी कृपया सोनिया गांधींना द्या. त्यांनी ती मान्य केली.
दिल्लीतील एका मराठी चॅनलच्या प्रतिनिधींनी या प्रसंगाची बातमी केली – ती प्रसिद्ध झाली. दुसऱ्याच दिवशी विलासरावजी दिल्लीला गेले होते. तिथं पत्रकारांनी त्यांना या सीडीबद्दल विचारलं. त्यांना आश्चर्य वाटलं – “ही सीडी दिल्लीपर्यंत पोहोचली कशी?”
नंतर दीपावलीच्या निमित्ताने ते लातूरला आले. MIDC येथील मूकबधिर विद्यालयात त्यांची भेट झाली. मी त्यांना तीच सीडी भेट दिली. त्यांनी ती हसून स्वीकारली आणि विचारलं, “हीच सीडी दिल्लीमध्ये विमोचित झाली का?” मी हो म्हणालो. ते हसले, म्हणाले, “दिल्लीमध्ये पत्रकारांनी विचारलं, तेव्हा वाटलं, कोणी तरी आपलाच लातूरकर असावा!”
त्यांचे पीए श्रीकांत सोनवणे यांनी हा किस्सा दिलीपरावजींना सांगितला. ते म्हणाले, “दिपरत्ननं एवढ्या कमी वयात दिल्ली पाहिली… बघा, काहीजण पन्नाशी ओलांडतात तरी दिल्लीचं दर्शनही घडत नाही!”
तो क्षण माझ्यासाठी फक्त एका माहितीपटाचं यश नव्हतं – तो माझ्या पत्रकार म्हणून झालेल्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. लातूरचं प्रेम, विलासरावजींचं आशिर्वाद, आणि दिल्लीच्या वाऱ्यात मिसळलेली माझी स्वप्नं – हे सगळं त्या एका सीडीमध्ये बंद झालं होतं.
आजही लातूरच्या रस्त्यांवरून फिरताना, ग्रामीण भागातील घरांमध्ये जाऊन पाहताना, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींनी पाणी येते – कारण हे नेतृत्व केवळ राजकीय नव्हते, तर ते जनतेच्या काळजात घर करून गेलेले होते.
विलासराव देशमुख हे नाव आता केवळ एका व्यक्तीचं राहिलेलं नाही – ते एक विचार आहेत, एक दृष्टिकोन आहेत, आणि सामान्यांसाठी एक आश्वासक सावलीसारखे आहेत.
अशा कार्यशील, दूरदृष्टीसंपन्न, संवेदनशील नेतृत्वाला त्यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

